Indian Airforce News : भारतीय हवाई दलासाठी 114 नवीन ‘राफेल’ खरेदीला मंजुरी! 90 विमाने भारतातच तयार होणार; अमेरिकेकडूनही 6 लढाऊ विमाने घेणार

India Buy 114 New Refale Plane From France : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत 50 टक्के स्वदेशी सामग्री वापरण्यावर भर
ANI | चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या हवाई दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी मोठी झेप घेतली आहे. तब्बल 114 राफेल विमानांच्या खरेदी प्रस्तावाला गुरुवारी हिरवा कंदील मिळाला. विशेष म्हणजे, या करारांतर्गत तंत्रज्ञान हस्तांतरणावर अधिक भर देण्यात येणार असून, भारताची ‘आत्मनिर्भरता’ वाढवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
राफेल कराराचे स्वरूप: 90 विमाने ‘स्वदेशी’ पद्धतीने बनणार
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात अंतिम स्वाक्षरी होण्याची शक्यता असलेल्या या करारात काही अटी घालण्यात आल्या आहेत.
स्वदेशी बनावट: 114 पैकी 90 विमाने भारतातच तयार केली जातील.
सामग्रीचा वापर: पूर्वी 30 टक्के स्वदेशी सामग्री वापरण्याची चर्चा होती, मात्र आता ती मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
शस्त्र प्रणाली: या विमानांवर भारतीय शस्त्रे आणि प्रणाली बसवण्याचे पूर्ण अधिकार भारताकडे असतील.
भारतीय हवाई दलाकडे सध्या 36 राफेल विमाने ताफ्यात आहेत, तर नौदलासाठी 26 राफेल ‘एम’ विमाने घेतली जाणार आहेत. एकाच प्रकारचे विमान ताफ्यात असल्याने प्रशिक्षण आणि देखभालीचा खर्च कमी होण्यास मदत होईल.
अमेरिकेकडून ‘पी-8 आय’ (P-8I) विमानांची खरेदी
सागरी सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी सहा पी-8 आय (P-8I) विमाने अमेरिकेकडून खरेदी करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. ही विमाने प्रामुख्याने पाणबुडीविरोधी युद्ध आणि सागरी देखरेखीसाठी वापरली जातात. 2019 पासून रेंगाळलेला हा करार आता मार्गी लागणार असून, बोईंग कंपनीशी या संदर्भात अंतिम चर्चा सुरू आहे.



