Palghar Bribe News : जव्हारमध्ये लाचखोर तलाठ्यांवर ‘एसीबी’ची झडप! ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच; 10 हजारांच्या रकमेसह दोघे अटकेत

•प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यालाच लुटण्याचा प्रयत्न; पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई
पालघर | जव्हार तालुक्यातील जामसर आणि हिरडपाडा येथील दोन ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी एका घरकुल लाभार्थ्याकडून लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गजानन जोहरे आणि सिताराम इंधन अशी अटक करण्यात आलेल्या दोन लोकसेवकांची नावे आहेत. या दोघांनी तक्रारदाराचा रेतीचा ट्रॅक्टर सोडण्यासाठी लाचेची मागणी केली होती.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदाराला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. 10 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास तक्रारदार स्वतः लंडी नदीमधून घरकुल बांधकामासाठी रेती काढून आणत असताना, तलाठी सिताराम इंधन आणि गजानन जोहरे यांनी त्यांचा ट्रॅक्टर अडवला.
ट्रॅक्टरवर वाळू चोरीची कारवाई न करता तो सोडून देण्यासाठी सुरुवातीला 40 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने त्यातील 20 हजार रुपये जागीच दिले, तर उर्वरित 20 हजार रुपये दुसऱ्या दिवशी देण्याचे ठरले होते.
उर्वरित पैसे दिले नाहीत तर ट्रॅक्टर जप्त करण्याची धमकी या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला दिली होती. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
‘एसीबी’चा सापळा आणि अटक
मिळालेल्या तक्रारीची 11 फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती उर्वरित रकमेपैकी 10 हजार रुपये स्वीकारण्याचे दोन्ही आरोपींनी मान्य केले. त्यानुसार सायंकाळी सापळा रचण्यात आला आणि पंचांच्या समक्ष 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना या दोन्ही ग्राम महसूल अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले.
कारवाईतील पथक
ही यशस्वी कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक दादाराम करांडे, पोलीस निरीक्षक राकेश डांगे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. सध्या जव्हार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


