महाराष्ट्रमुंबई
Trending

Sunetra Pawar : अजितदादांनंतर सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रवादीची सूत्रे; दिल्लीत अमित शाहांची भेट आणि विलीनीकरणाच्या प्रस्तावावर खलबते!

NCP Member Meet Amit Shah : पार्थ पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंची उपस्थिती; राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देऊन सुनेत्रा पवार पूर्णवेळ राज्याच्या राजकारणात सक्रिय होणार

नवी दिल्ली | अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) प्रमुख चेहरा म्हणून सुनेत्रा पवार आता सक्रिय झाल्या आहेत.उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी तातडीने दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. या हाय-प्रोफाइल बैठकीत केवळ सदिच्छा भेट नसून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीवर आणि विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते.

अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या (विलीनीकरण) चर्चेने जोर धरला आहे. शरद पवार गटाच्या नेत्यांनी दावा केला आहे की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत ही खुद्द अजितदादांची इच्छा होती. मात्र, हे विलीनीकरण इतके सोपे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, असा कोणताही मोठा राजकीय निर्णय घेण्यापूर्वी भाजपला विश्वासात घेणे अनिवार्य असेल. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी अमित शाहांची घेतलेली भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विलीनीकरणाबाबत भाजपची नेमकी भूमिका काय आहे आणि महायुतीतील आगामी समीकरणे कशी असतील, यावर या बैठकीत खल झाला आहे.

दुसरीकडे, सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री झाल्याने त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची वर्णी लावणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या जागेसाठी पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा असून, दिल्लीतील बैठकीत यावरही शिक्कामोर्तब झाले असण्याची शक्यता आहे.

अजितदादांच्या जाण्याने पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार स्वतः मैदानात उतरल्या आहेत. पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवणे आणि कार्यकर्त्यांना बळ देणे, हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे. त्यामुळेच, छगन भुजबळ यांच्यासह पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांनीही विलीनीकरणाच्या मुद्द्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. सुनेत्रा पवारांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे आगामी काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) भविष्याबाबत एखादा मोठा आणि निर्णायक निर्णय जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0