Pune Police News : पुणे पोलिसांचा ‘मिडनाईट’ थरार! बुधवार पेठेत 50 कुंटणखान्यांवर धाडी; बांगलादेशी घुसखोर आणि अमली पदार्थ रडारवर!

Pune Police Latest News : लाचखोर पोलिसाच्या निलंबनानंतर खाकीचा रौद्र अवतार; हुक्का पार्लरसह बुलेटच्या कर्कश सायलेन्सरवरही कारवाईचा बडगा; मध्यरात्रीच्या कोम्बिंग ऑपरेशनने पुण्याची ‘लाल बत्ती’ हादरली!
पुणे | बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणीकडून पैसे घेऊन तिला संरक्षण देणाऱ्या महिला पोलिसाचे निलंबन होताच, पुणे पोलीस दलाने आपली आक्रमक पाऊले उचलली आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुधवारी मध्यरात्री बुधवार पेठेत एकाच वेळी शेकडो पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 3 वाजेपर्यंत चाललेल्या या ‘ऑपरेशन बुधवार पेठ’मध्ये पोलिसांनी प्रत्येक गल्ली सील करून 50 हून अधिक कुंटणखान्यांची कसून झडती घेतली. वस्तीत येणारे सर्व रस्ते नाकाबंदी करून बंद करण्यात आले होते, ज्यामुळे कोणालाही निसटण्याची संधी मिळाली नाही. Pune Police Latest News
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी विशेषतः मानवी तस्करी, अल्पवयीन मुलींकडून जबरदस्तीने करून घेतला जाणारा वेश्याव्यवसाय आणि बांगलादेशी घुसखोरांच्या बेकायदा वास्तव्यावर लक्ष केंद्रित केले. महिला पोलिसांच्या पथकाने कुंटणखान्यातील प्रत्येक खोलीची तपासणी करत तिथल्या महिलांची ओळखपत्रे तपासली. यासोबतच, अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या संशयित तरुणांचीही जागीच झाडाझडती घेण्यात आली. या धाडसत्रामुळे वर्षानुवर्षे तिथे पाय रोवून बसलेल्या अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले आहेत.
केवळ बुधवार पेठच नाही, तर शहराच्या इतर भागांतही पोलिसांनी समांतर कारवाया सुरू ठेवल्या आहेत. धनकवडीतील एका आलिशान इमारतीच्या टेरेसवर सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलिसांनी छापा टाकून मालकासह पाच जणांना बेड्या ठोकल्या. तर वारजे माळेवाडी परिसरात रात्रीच्या शांततेचा भंग करणाऱ्या 15 बुलेटस्वारांचे कर्कश सायलेन्सर जप्त करून पोलिसांनी त्यांची विल्हेवाट लावली. विशेष म्हणजे, असे सायलेन्सर बदलून देणाऱ्या गॅरेज मालकावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खाकी वर्दीची प्रतिमा मलिन करणाऱ्या कर्मचाऱ्याला घरी पाठवून आता पुणे पोलिसांनी गुन्हेगारांना ‘सळो की पळो’ करून सोडले आहे.



