
Rohit Pawar On Ajit Pawar : अफवांचे पेव आणि सत्याचा शोध; जळालेला स्वेटर अन् 15 मिनिटे पुढे असलेल्या वेळेने संपवला संभ्रम; “दादा गेलेत, आता केवळ विचार उरलेत” – रोहित पवारांचा आक्रोश
मुंबई | बारामती विमान अपघातानंतर अजित पवारAjit Pawar जिवंत आहेत, ते सुरक्षित ठिकाणी आहेत किंवा त्यांचा मृतदेह सापडलाच नाही, अशा अनेक वावड्या सोशल मीडियावर उठल्या होत्या. या सर्व चर्चांमुळे केवळ कार्यकर्त्यांच्या मनातच नाही, तर पवार कुटुंबातही गोंधळ निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी आज पुराव्यांसह सत्य महाराष्ट्रासमोर ठेवले. “मलाही वाटत होतं की हे सगळं एक वाईट स्वप्न असावं, पण घटनास्थळी जे पाहिलं त्यातून वास्तवाचा भीषण चेहरा समोर आला,” असे रोहित पवार म्हणाले.
मृत्यूची साक्ष देणारं ‘ते’ मनगटी घड्याळ अजितदादांच्या वक्तशीरपणाची संपूर्ण राज्याला माहिती होती. ते त्यांचे घड्याळ नेहमी 15 मिनिटे पुढे ठेवत असत. रोहित पवारांनी सांगितले की, अपघाताच्या ढिगाऱ्यात दादांचे घड्याळ सापडले, जे नेमके 9 वाजता बंद पडले होते. विमान अपघाताची वेळ सकाळी 8.45 च्या सुमारास होती, म्हणजेच दादांच्या सवयीप्रमाणे 15 मिनिटे पुढच्या वेळेनुसार त्या घड्याळाने 9 वाजता अखेरचा ठोका दिला होता. या एका पुराव्याने दादांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केल्याचे रोहित यांनी सांगितले.
6 मृतदेह की 5 ?
संभ्रमावर स्पष्टीकरण विमानात 6 जण असताना केवळ 5 मृतदेह कसे बाहेर आले, या तांत्रिक शंकेचेही रोहित पवारांनी निरसन केले. भीषण आगीमुळे शरीराचे काही अवशेष ओळखू न येण्यापलीकडे गेले होते. घटनास्थळी सापडलेला जळालेला स्वेटर आणि चप्पल पाहून पार्थिवाची ओळख पटवण्यात आली. “काही लोक म्हणतात ती बॉडी दादांची नव्हती, पण मी प्रत्यक्ष तिथे होतो. दादांनी नेहमीच प्रयत्नांची साथ सोडली नाही, त्याच विचारातून मी ही सर्व माहिती गोळा केली जेणेकरून लोकांना सत्य कळावे,” असे रोहित पवारांनी स्पष्ट केले.
भावूक आठवणी आणि अखेरचा निरोप पत्रकार परिषदेत रोहित पवार अत्यंत भावूक झाले होते. “जर खरोखरच दादा परत आले असते, तर मी त्यांना घट्ट मिठी मारली असती. सिग्नलवर थांबलो असतानाही सामान्य माणसं मला विचारतात की दादा कधी येणार? पण दादा आता परत येणार नाहीत, हेच भीषण सत्य आहे,” असे ते म्हणाले. अजितदादा आज शरीराने आपल्यात नसले तरी, त्यांचे शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचार आणि त्यांनी केलेल्या विकासाच्या कामांतून ते नेहमीच आपल्यासोबत राहतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.



