
Rohit Pawar On Ajit Pawar Accident : विमानाचा तांत्रिक घटनाक्रम आणि संशयास्पद तपशील मांडणार; ‘डोळे उघडणारे’ पुरावे समोर आणण्याचा रोहित पवारांचा इशारा
मुंबई | राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी निधनाबाबत संपूर्ण महाराष्ट्रात शंकेचे मोहोळ उठले आहे. या अपघातामागील सत्य काय? हा केवळ तांत्रिक बिघाड होता की घातपात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आमदार रोहित पवार आज, मंगळवारी दुपारी 4 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. रोहित पवारांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे आज राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे रोहित पवारांची भूमिका?
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, “बारामतीतील विमान अपघाताबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत मी काही महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार आहे.” मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार विमानाचा ‘फ्लाइट डेटा’, हवामानाचा अहवाल आणि विमान उड्डाणापूर्वीचे काही संशयास्पद बदल यावर प्रेझेंटेशन देण्याची शक्यता आहे.
बजरंग सोनवणे आणि अमोल मिटकरींचे गंभीर आरोप
यापूर्वी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी विमानात स्फोट झाल्याचा किंवा बॉम्ब ठेवल्याचा खळबळजनक संशय व्यक्त केला होता. तर दुसरीकडे, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही विमानातून बेपत्ता असलेल्या एका संशयास्पद व्यक्तीबाबत आणि वैमानिकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार आज नेमके कोणते तांत्रिक पुरावे सादर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विलिनीकरणाचा पेच आणि 12 फेब्रुवारीची तारीख
अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार का? यावरही चर्चा रंगली आहे. रोहित पवार यांनी यापूर्वीच संकेत दिले आहेत की, विलिनीकरणाबाबत अजितदादांची नेमकी काय इच्छा होती, याचा खुलासा ते 12 फेब्रुवारी रोजी करणार आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत केवळ अपघाताच्या तांत्रिक बाजूवर भर दिला जाण्याची शक्यता आहे.
नेमका अपघात कसा झाला होता?
28 जानेवारीला सकाळी 8.45 च्या सुमारास अजित पवार यांचे खाजगी विमान (Learjet 45) बारामती विमानतळावर उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. विमानाने जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच हवेत स्फोट झाल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केला होता. या अपघातात अजित पवारांसह त्यांचे स्वीय सहाय्यक, सुरक्षा रक्षक आणि दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता.



