PM Modi : संसदेत अभूतपूर्व रणकंदन! राज्यसभेत गदारोळामुळे मोदींना भाषण थांबवावे लागले; ‘वयाचा विचार करा’ म्हणत खर्गेंना टोला

•22 वर्षांत पहिल्यांदाच लोकसभेत पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय आभार प्रस्ताव मंजूर; विरोधकांचा सभात्याग, सरकारवर ‘हुकूमशाही’चा आरोप
ANI :- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सातवा दिवस सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्षाने कमालीचा गाजला. लोकसभेत झालेल्या गदारोळानंतर राज्यसभेतही त्याचे तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहताच काँग्रेसच्या खासदारांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे स्वतः आक्रमक झाल्याचे पाहून पंतप्रधानांनी त्यांच्यावर निशाणा साधला. “खरगेजी, किमान आपल्या वयाचा आणि पदाचा विचार करून तरी शांत बसावे,” अशा शब्दांत मोदींनी त्यांना फटकारले, ज्यामुळे सभागृहात मोठी खडाजंगी पाहायला मिळाली.
माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील दाव्यांचा आधार घेत विरोधकांनी सकाळपासूनच दोन्ही सभागृहात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. लोकसभेत राहुल गांधी यांना चीनच्या मुद्द्यावर बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत काँग्रेस सदस्यांनी राज्यसभेतही “विरोधी पक्षनेत्याला बोलू द्या” अशा घोषणा दिल्या. पंतप्रधान भाषणाला उभे असताना मल्लिकार्जुन खरगे वारंवार आसनावरून उठून निषेध व्यक्त करत होते. विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पंतप्रधान मोदींना काही क्षणांसाठी आपले भाषण थांबवावे लागले. यावेळी मोदींनी विरोधकांच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करत आपले भाषण सुरूच ठेवले, परंतु खर्गेंच्या मध्यस्थीनंतर त्यांनी टोलेबाजी करत विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पंतप्रधानांचे भाषण सुरू असतानाच विरोधकांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला सभागृहात महत्त्वाच्या विषयांवर बोलू दिले जात नाही आणि सरकार लष्करप्रमुखांच्या पुस्तकातील सत्य लपवत आहे, असा दावा करत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सभागृहातून काढता पाय घेतला. विरोधकांच्या अनुपस्थितीत पंतप्रधानांनी आपले भाषण पूर्ण केले, ज्यामध्ये त्यांनी भारत-अमेरिका व्यापार करार आणि देशाच्या वाढत्या आर्थिक ताकदीचा गौरव केला. राहुल गांधींच्या आरोपांना थेट उत्तर देणे टाळत मोदींनी तरुणांच्या रोजगार आणि स्टार्टअप इंडियावर भर दिला. दरम्यान, संसदेच्या इतिहासात पंतप्रधानांना अशा प्रकारे भाषण थांबवून ज्येष्ठ नेत्यांना टोला लगावण्याची ही पहिलीच वेळ असल्याने राजकीय वर्तुळात यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.



