सातारा

Karad News : ‘दादां’च्या निधनानंतर वहिनींचा पहिला दौरा; कराडमध्ये यशवंतरावांना अभिवादन, तर फलटणमध्ये ‘त्या’ कुटुंबाचे अश्रू पुसणार

•उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार साताऱ्यात; विमान अपघातात प्राण गमावलेल्या विदीप जाधवांच्या निवासस्थानी देणार भेट

सातारा/कराड | उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज आपल्या सार्वजनिक कामाला सुरुवात केली आहे. अजितदादा ज्यांना आपले राजकीय दैवत मानायचे, त्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होऊन सुनेत्रा पवार यांनी आपल्या नव्या इनिंगचा श्रीगणेशा केला. मात्र, या दौऱ्यात राजशिष्टाचारापेक्षाही ‘माणुसकी’ आणि ‘सांत्वन’ याला अधिक महत्त्व असल्याचे दिसून येत आहे.

यशवंतरावांच्या विचारांचा वसा पुढे नेणार

सकाळी 10 वाजता कराड येथील प्रीतीसंगम बागेत सुनेत्रा पवार यांचे आगमन झाले. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. अजितदादांच्या राजकीय प्रवासात हे स्थळ नेहमीच ऊर्जा देणारे राहिले होते. तोच वारसा पुढे चालवण्याचा संदेश सुनेत्रा वहिनींनी या भेटीतून दिला आहे.
विदीप जाधव यांच्या कुटुंबाचे सांत्वन
कराडमधील दर्शनानंतर सुनेत्रा पवार फलटणकडे रवाना झाल्या आहेत. दुपारी १ वाजता त्या अजितदादांचे निष्ठावान अंगरक्षक (PSO) विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देणार आहेत.

दुर्दैवी अपघात: 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजितदादांसोबत विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता.
कर्तव्यदक्ष अंगरक्षक: विदीप जाधव हे 2019 पासून अजितदादांसोबत सावलीसारखे असायचे. 29 जानेवारी रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी विदीप यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. आता सुनेत्रा पवार स्वतः या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी त्यांच्या घरी जात आहेत.

अपघातातील इतर मृतांच्या आठवणी
बारामती विमान अपघातात अजितदादा आणि विदीप जाधव यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, को-पायलट शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या कुटुंबांनाही आधार देण्याचे काम सरकार आणि पवार कुटुंबाकडून केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0