Cyber Crime News : सायबर चोरांपासून सावध राहा! भाईंदरच्या ‘आवर लेडी ऑफ बेथलहेम’ चर्चमध्ये पोलिसांचा सायबर सुरक्षा मंत्र; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Mira Bhayandar Cyber Crime Awareness : पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून जनजागृती मोहिमेचा धडाका; 20 ते 75 वयोगटातील नागरिकांना दिले सायबर सुरक्षेचे धडे
मिरा-भाईंदर | वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि सामान्य नागरिकांमध्ये सतर्कता निर्माण करण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सायबर सुरक्षेबाबत विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत 29 जानेवारी 2026 रोजी भाईंदर (पश्चिम) येथील ‘आवर लेडी ऑफ बेथलहेम चर्च’ (प्रेरणा सेवा केंद्र, डोंगरी, उत्तन) येथे सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
तज्ञांचे मार्गदर्शन आणि सविस्तर माहिती
पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उप-निरीक्षक वैभव धनवडे आणि पोलीस अंमलदार राहुल बन यांनी उपस्थित 40 ते 50 श्रोत्यांना ऑनलाईन जगतातील धोक्यांची माहिती दिली.
या कार्यक्रमात खालील महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.


सध्याचे सायबर ट्रेंड्स: सध्या कोणत्या प्रकारे नागरिकांची फसवणूक केली जात आहे, याची सविस्तर माहिती देण्यात आली.
सोशल मीडिया शिष्टाचार: फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप वापरताना कोणती काळजी घ्यावी आणि सोशल मीडियाशी संबंधित गुन्हे कसे टाळावेत, यावर पीपीटी (PPT) द्वारे सादरीकरण करण्यात आले.
सुरक्षित आर्थिक व्यवहार: इंटरनेट बँकिंग किंवा युपीआय (UPI) द्वारे पैसे पाठवताना घ्यायची खबरदारी आणि सुरक्षित पासवर्डचे महत्त्व पटवून दिले.
तक्रार कुठे करावी?
ऑनलाईन फसवणूक झाल्यास वेळ न घालवता 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार कशी नोंदवावी, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
या कार्यक्रमात 20 वर्षांच्या तरुणांपासून ते 75 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच मोठा रस दाखवला. उपस्थितांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले आणि पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. दैनंदिन जीवनात इंटरनेटचा वापर करताना आपली गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये, अशा महत्त्वाच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.


