
Mira Bhayandar Cyber Fraud : अनोळखी ॲप डाऊनलोड होताच बँक खाते झाले रिकामे; नयानगरमधील नागरिकाला सायबर पोलिसांमुळे मिळाला दिलासा
मिरा-भाईंदर | व्हॉट्सॲपवर आलेल्या एका अज्ञात लिंकवर क्लिक करणे एका नागरिकाला चांगलेच महागात पडले. ‘APK’ फाईल डाऊनलोड होताच बँक खात्यातून 97 हजार रुपये लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार नयानगर परिसरात घडला. मात्र, मिरा-भाईंदर, वसई-विरार सायबर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत ही संपूर्ण रक्कम तक्रारदाराला परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे. Mira Bhayandar Latest Cyber Fraud News
नेमकी घटना काय?
नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे मुल्या यांना व्हॉट्सॲपवर एक लिंक प्राप्त झाली होती. त्यांनी कुतूहलापोटी त्या लिंकवर क्लिक केले असता, त्यांच्या मोबाईलमध्ये एक अनोळखी ॲप (APK File) आपोआप डाऊनलोड झाले. या ॲपच्या माध्यमातून सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवून बँकेची गोपनीय माहिती चोरली आणि खात्यातून 97 हजार रुपये लंपास केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुल्या यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सायबर पोलिसांची तत्पर कारवाई
तक्रार प्राप्त होताच सायबर पोलिसांनी ‘NCCRP’ पोर्टलवर तात्काळ नोंद केली. तांत्रिक तपासाद्वारे ही रक्कम ज्या 3 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग झाली होती, त्यांचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी बँकांशी वारंवार पत्रव्यवहार करून संशयित खात्यांमधील व्यवहार गोठवले (Freeze), ज्यामुळे चोरांना पैसे काढता आले नाहीत.
न्यायालयीन आदेशाने रक्कम सुपूर्द
बँक खात्यात अडकलेली ही रक्कम परत मिळवण्यासाठी पोलिसांनी तक्रारदाराला न्यायालयात अर्ज करण्यास सांगितले. सायबर पोलिसांनी न्यायालयात सविस्तर अहवाल सादर केल्यानंतर, माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार ही संपूर्ण 97 हजार रुपयांची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात पुन्हा जमा करण्यात आली आहे.
या पथकाने केली यशस्वी कामगिरी
ही कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रकाश सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, माणिकराव कतुरे, वैभव धनवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.


