पुणे
Trending

Shahapur News : शहापूर हादरले! भात खरेदी घोटाळ्यातील आरोपी हरीश दरोडा यांचा तुरुंगात हृदयविकाराने मृत्यू

Harish Daroda Latest News : राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांचे होते पुतणे; 1.60 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी होते अटकेत; ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

शहापूर l शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीश दरोडा यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आदिवासी विकास महामंडळाच्या बहुचर्चित भात खरेदी घोटाळ्यात अटकेत असलेले दरोडा कारागृहात असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण शहापूर तालुक्यात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे ‘साकडबाव’ भात खरेदी घोटाळा?

2022-23 च्या खरीप आणि रब्बी हंगामात साकडबाव केंद्रांतर्गत किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. सरकारी कागदपत्रांवर 13 हजार 892 क्विंटल भात खरेदी दाखवण्यात आली होती, मात्र प्रत्यक्ष तपासणीत सुमारे 5 हजार 120 क्विंटल भात जागेवर शिल्लकच नव्हता. बोगस चलन पावत्या आणि शेतकऱ्यांच्या नावावर बनाव करून तब्बल 1 कोटी 60 लाख रुपयांचा हा घोटाळा असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात हरीश दरोडा यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तुरुंगात असतानाच काळाचा घाला साकडबाव आदिवासी सेवा सोसायटीचे अध्यक्ष म्हणून हरीश दरोडा यांना पोलिसांनी अटक करून त्यांची रवानगी कारागृहात केली होती. कारागृहात असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अटकेपूर्वी दरोडा यांनी आपला या घोटाळ्याशी थेट संबंध नसल्याचा दावा केला होता आणि केंद्रप्रमुख जयराम सोगीर यांच्यावर जबाबदारी ढकलली होती. मात्र, पोलिसांनी पुराव्यांच्या आधारे त्यांना आरोपी केले होते.

शहापुरात तणावपूर्ण शांतता एका आमदाराच्या पुतण्याचा अशा प्रकारे पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाल्याने शहापुरात विविध चर्चांना उधाण आले आहे. दरोडा यांच्या समर्थकांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून, पोलीस प्रशासनाकडून या मृत्यूची अधिकृत नोंद करून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात अडकलेले महामंडळाचे तत्कालीन अधिकारी विजय गांगुर्डे आणि अविनाश राठोड यांच्यासह इतर आरोपींच्या तपासाचे काय होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0