क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Navi Mumbai : नवी मुंबई पोलिसांचा डोंगरदऱ्यात छापा; गावठी दारूचा मोठा हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त

Navi Mumbai Police News : शेलघर परिसरातील कारवाईत 1200 लिटर रसायन नष्ट; चार आरोपींना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

नवी मुंबई l पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पनवेल जवळील शेलघर परिसरात डोंगराच्या कडेला सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दारू तयार करण्यासाठी लागणारे 1200 लिटर कच्चे रसायन जागीच नष्ट केले असून चार जणांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेलघर गावातील स्मशानभूमीच्या मैदानाजवळील आश्रम शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डोंगराळ भागात झाडाझुडपांच्या आडोशाने अवैध दारू गाळली जात असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार करून डोंगराळ भागात शोधमोहीम राबवली. यावेळी चार संशयीत इसम विनापरवाना गावठी दारू तयार करताना रंगेहात मिळून आले.

पोलिसांनी या ठिकाणाहून जयंत रमेश भगत (वय 40, रा. शेलघर), रोहित सुधाकर कातकरी (वय 20, रा. जासई), गोविंद हरीचंद्र वाघमारे (वय 20, रा. जासई) आणि नितीन दिलीप कातकरी (वय 20, रा. जासई) या चार आरोपींना अटक केली. घटनास्थळी गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, रसायनाचे प्रत्येकी 200 लिटरचे 6 पिंप आणि तयार झालेली 5 लिटर गावठी दारू असा एकूण 1 लाख 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून 1200 लिटर कच्चे रसायन घटनास्थळीच नष्ट केले.

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे आणि पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत उलवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0