Mumbai Police : मोबाईल लोकेशनचा लपंडाव अन् पोलिसांची ‘इगल आय’! 10 गुन्हे अंगावर असलेला सराईत नराधम अखेर नालासोपारा पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai Police Latest News : जेल परिसरात लोकेशन दाखवून पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न फसला; डोंबिवलीच्या मानपाड्यातून महेश पाटीलला ठोकल्या बेड्या
नालासोपारा | स्वतःचा मोबाईल बंद ठेवून आणि फिर्यादीचा मोबाईल पळवून पोलिसांना ‘लोकेशन’च्या चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराचा डाव नालासोपारा पोलिसांनी अत्यंत शिताफीने उधळून लावला आहे. बलात्कार, खूण आणि फसवणुकीसारखे तब्बल 10 गंभीर गुन्हे अंगावर असलेल्या महेश पाटील उर्फ विजय आत्माराम पाटील (35 वय) याला पोलिसांनी डोंबिवलीच्या मानपाडा परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. तांत्रिक तपासाला हुलकावणी देण्यासाठी आरोपीने वापरलेली ‘जेल लोकेशन’ची शक्कल अखेर पोलिसांच्या जिद्दीपुढे फिकी पडली. Nalasopra Police Latest News
31 डिसेंबर 2025 रोजी नालासोपारा पोलीस ठाण्यात या नराधमाविरोधात बलात्कारासह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा केल्यानंतर आरोपीने अत्यंत चलाखीने फिर्यादीचा मोबाईल चोरला आणि स्वतःचा फोन वापरणे बंद केले. तांत्रिक तपासादरम्यान पोलीस जेव्हा लोकेशन ट्रेस करायचे, तेव्हा त्यांना हे लोकेशन वेगवेगळ्या कारागृहांच्या (जेल) परिसरात दिसायचे. यामुळे पोलीस पथकासमोर मोठा संभ्रम निर्माण झाला होता. आरोपी नक्की जेलमध्ये आहे की बाहेर, अशा पेचात पोलीस असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली. एक पथक जळगावला, तर दुसरे नवी मुंबईत तळ ठोकून होते.
तपासाचे चक्र फिरवत असताना पोलिसांनी पारंपरिक गुप्तहेरांचे जाळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घातला. आरोपी लोकेशन बदलून पोलिसांना चकवत असला, तरी त्याच्या सवयी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास करून पोलिसांनी त्याचा नेमका ठावठिकाणा शोधून काढला. अखेर डोंबिवलीच्या मानपाडा परिसरात सापळा रचून या सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात आले. महेश पाटील याचा इतिहास तपासला असता, तो केवळ बलात्कारीच नसून 2014 पासून खूण आणि फसवणुकीच्या अनेक प्रकरणांत हवा असलेला गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याच्यावर मानपाडा, ए.पी.एम.सी, पनवेल, भांडुप आणि पवई अशा विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नालासोपारा पोलिसांनी ही कामगिरी फत्ते केली. या अटकेमुळे अनेक प्रलंबित गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून, गुन्हेगारांनी कितीही तंत्रज्ञानाचा आधार घेतला तरी कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचतातच, हे नालासोपारा पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.


