
Ambernath Political Latest News : काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपचा प्लॅन फसला; शिंदेंच्या 32 नगरसेवकांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे सत्तास्थापनेचा दावा
अंबरनाथ | नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर अंबरनाथच्या राजकारणाने नाट्यमय वळण घेतले आहे. काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडून बहुमताचा आकडा गाठण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला खासदार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांनी मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेने (शिंदे गट) आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्तास्थापनेचा दावा केला असून तसे अधिकृत पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सोपवले आहे.
नगराध्यक्ष भाजपचा, पण नगरसेवक शिवसेनेचे अधिक
अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत नगराध्यक्षपद काबीज केले. भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील यांनी शिवसेनेच्या मनिषा वाळेकर यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. मात्र, नगरसेवक पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने 27 जागांसह बाजी मारली. नगराध्यक्ष आपला असला तरी बहुमत नसल्याने भाजपने काँग्रेसचे नगरसेवक फोडण्याचे तंत्र अवलंबले होते.
फोडाफोडीचे राजकारण आणि श्रीकांत शिंदेंचा पलटवार
अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसचे 10 नगरसेवक आपल्या गटात खेचल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी तातडीने सूत्रे हलवली. त्यांनी शिवसेनेच्या 27 नगरसेवकांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक आणि 1 अपक्ष अशा एकूण 32 नगरसेवकांचे संख्याबळ एकत्र केले. शिवसेनेचे सर्व नगरसेवक ठाण्यातील आनंद आश्रम येथे जमले आणि तिथूनच या नव्या आघाडीची घोषणा करण्यात आली. 32 हा आकडा बहुमतासाठी पुरेसा असल्याने आता नगरपरिषदेत शिवसेनेचा वरचष्मा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अंबरनाथमधील पक्षीय बलाबल (नगरसेवक)
पक्ष नगरसेवक संख्या
शिवसेना (शिंदे गट) 27
भाजप 16
काँग्रेस 12 (यातील 10 जण भाजपच्या वाटेवर)
राष्ट्रवादी (अजित पवार) 04
अपक्ष 01
एकूण नगरसेवक 60
रवींद्र चव्हाण विरुद्ध श्रीकांत शिंदे प्रतिष्ठा पणाला
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अंबरनाथमध्ये भाजपने नगराध्यक्षपद जिंकून बाजी मारली असली, तरी नगरपरिषदेच्या कामकाजात आणि सत्तेच्या चाव्या मिळवण्यात श्रीकांत शिंदे यांनी ‘शह-काटशहा’चे राजकारण यशस्वी केले आहे.


