Devendra Fadnavis : ‘ना बाण ना खान, राखू भगव्याची शान’; संभाजीनगरात युती तुटण्यावर फडणवीसांचे मोठे विधान!

Devendra Fadnavis On Sambhaji Nagar Mahayuti : शिंदेंच्या शिवसेनेत गटबाजी असल्यानेच युती फिसकटली; निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येण्याचे फडणवीसांचे संकेत
छत्रपती संभाजीनगर | येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी राजकारण तापले असतानाच, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती का तुटली? यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे भाष्य केले आहे. एका विशेष ‘टॉक शो’मध्ये बोलताना फडणवीस यांनी “शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत गटबाजी आणि विसंवाद असल्यानेच युती होऊ शकली नाही,” असा स्पष्ट दावा केला आहे.
“आमचे नेते वैतागले होते”
युतीसाठी केलेल्या प्रयत्नांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “संभाजीनगरात युती टिकावी यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, शिवसेनेत दोन-तीन वेगवेगळे गट असल्याने एका नेत्याने प्रस्तावाला मान्यता दिली की दुसरा नेता त्यात खोडा घालायचा. चार ते पाच वेळा प्रस्तावांवर चर्चा होऊनही त्यांच्या अंतर्गत भांडणामुळे तोडगा निघाला नाही. आमचे स्थानिक नेते या प्रकारामुळे पूर्णपणे वैतागून गेले होते.” त्यांनी यावेळी मंत्री संजय शिरसाट यांच्याशी झालेल्या चर्चेचाही संदर्भ दिला.
‘बाण’ आणि ‘खान’ला भाजपचे उत्तर
या निवडणुकीत भाजपचा अजेंडा काय असेल, या प्रश्नावर फडणवीसांनी एक नवीन घोषणा दिली. “संभाजीनगरात याआधी ‘बाण की खान’ असा सामना व्हायचा. पण आता आमची स्वतंत्र लढत असल्याने ‘ना बाण ना खान, राखू भगव्याची शान’ हा आमचा नारा असेल,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
निवडणुकीनंतर पुन्हा दोस्ती?
युती तुटल्याबद्दल खंत व्यक्त करतानाच फडणवीसांनी भविष्यातील मैत्रीचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. “आम्ही स्वतंत्र लढत असलो तरी शत्रू नाही, ही लढत मैत्रीपूर्ण आहे. आम्हाला बहुमत मिळाले तरी आणि नाही मिळाले तरी आम्ही आमच्या मित्रांना (शिंदे गट) सोडणार नाही,” असे सांगत त्यांनी निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.



