मुंबई

Amit Thackeray : ‘सत्ता मिळवण्यासाठी कोणाचे घर उद्ध्वस्त करू नका’; अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना अत्यंत भावनिक पत्र!

•सोलापूरमधील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येनंतर अमित ठाकरे आक्रमक; सरवदे यांच्या मुलींच्या भवितव्याची जबाबदारी घेण्याची मागणी

मुंबई | सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, मनसे नेते अमित ठाकरे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक अत्यंत भावनिक आणि आग्रही पत्र लिहिले आहे. “राजकारण या थराला जाऊ शकते, याचा कधी विचारही केला नव्हता,” अशा शब्दांत अमित ठाकरे यांनी आपली खंत व्यक्त केली आहे.

मुलींचा आक्रोश पाहून मन स्तब्ध

अमित ठाकरे यांनी नुकतीच सोलापुरात जाऊन सरवदे कुटुंबाची भेट घेतली. पत्रात त्या भेटीचा उल्लेख करताना ते म्हणतात, “बाळासाहेबांच्या दोन लहान मुलींचा आक्रोश ऐकून मन स्तब्ध झाले. ज्या चिमुकल्यांनी काल वडिलांचे अस्थी विसर्जन केले, त्यांना अजून हेही ठाऊक नाही की त्यांचे बाबा कधीच परतणार नाहीत. निवडणुका होत राहतील, पण सत्तेसाठी कोणाचे घर असे उद्ध्वस्त व्हावे? ही कोणती संस्कृती आपण जपत आहोत?”

मुख्यमंत्र्यांकडे तीन प्रमुख मागण्या

अमित ठाकरे यांनी आपल्या पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे तीन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत:

1.कुटुंबाची जबाबदारी: हत्येमुळे आधार हरवलेल्या सरवदे यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची आणि भविष्याची संपूर्ण जबाबदारी शासनाने उचलावी.

2.कठोरातील कठोर कारवाई: या क्रूर कृत्यातील नराधमांना अशी शिक्षा व्हावी की, पुन्हा कोणाचीही असे कृत्य करण्याची हिंमत होणार नाही.

3.निवडणूक नियमावलीत बदल: प्रचारादरम्यान होणाऱ्या हिंसेला चाप लावण्यासाठी आचारसंहितेमध्ये कडक नियमांची अंमलबजावणी करावी.

“भेटीसाठी वेळ मिळाला नाही, याची खंत” पत्रात अमित ठाकरे यांनी एका गोष्टीवर नाराजीही व्यक्त केली आहे. “सोलापूरला भेट दिल्यानंतर मला आपल्याशी तातडीने प्रत्यक्ष बोलायचे होते. मी आपल्या भेटीसाठी वेळ मागण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे आपली भेट होऊ शकली नाही, याची खंत वाटते,” असे त्यांनी पत्रात नमूद केले.

राजकीय वर्तुळात पत्राची चर्चा

निवडणुकीच्या काळात राजकीय वैमनस्यातून एका तरुण पदाधिकाऱ्याचा बळी गेल्याने सर्वच स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. “ही लढाई सत्तेची किंवा राजकारणाची नाही, तर न्यायाची आहे,” असे अमित ठाकरेंनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे. आता या पत्रावर मुख्यमंत्री काय पावले उचलतात आणि सरवदे कुटुंबाला शासन स्तरावर काय मदत मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0