Sanjay Raut : भाजप म्हणजे ‘दुतोंडी गांडूळ’; सत्तेसाठी कोणाच्याही शेजेवर जाण्यास तयार: संजय राऊत

•मराठी माणसाच्या हातूनच मराठी माणसाचे ‘डेथ वॉरंट’ काढले जातेय; ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीनंतर राऊतांचा भाजपवर घणाघात
मुंबई | निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था आणि प्रशासनात भाजपने बसवलेले अधिकारी मराठीच आहेत. मात्र, दुर्दैवाने मराठी माणसाच्या हातूनच मराठी माणसाचे ‘डेथ वॉरंट’ काढले जात आहे आणि त्यावर सही देखील मराठी माणसाचीच आहे, हे भाजपचे कसब आहे,” अशा बोचऱ्या शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा ‘खणखणीत’ वार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल पार पडलेली संयुक्त मुलाखत ही खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्राची मुलाखत’ होती, असे राऊत म्हणाले. “दोन धुरंधर एकत्र आले आणि महाराष्ट्राच्या समस्यांवर त्यांनी खणखणीतपणे मते मांडली. ही मुलाखत राज्याच्या दृष्टीने दिशादर्शक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
सावरकरांवरून मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला
वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करताना राऊत म्हणाले की, “तुम्ही आम्हाला सावरकरांचे विचार सोडल्याचे सांगता, पण मग सावरकरविरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यांना (अजित पवार) मंत्रिमंडळात कशाला ठेवता? सावरकरांचे विचार न मानणारा नेता सोबत घेऊन तुम्ही कसले पोकळ सल्ले देता? एकीकडे सावरकरांचे प्रेम आणि दुसरीकडे विरोधातील नेत्यांशी सत्ता, हा तुमचा दुटप्पीपणा आहे.”
भाजप-एमआयएम ‘भाई-भाई’
भाजपच्या राजकारणावर टीका करताना राऊतांनी ‘दुतोंडी गांडूळ’ असा शेलका शब्द वापरला. ते म्हणाले,
“मीरा-भाईंदरमध्ये भाजपने एमआयएमला पाठिंबा दिला आहे. आता ‘फडणवीस-ओवेसी भाई-भाई’ झालेत का?”
“अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहेत, मग आता भाजप ‘हिरवा’ झाला नाही का?”
“अकोटपासून मीरा-भाईंदरपर्यंत एमआयएमसोबत भाजपची छुपी, तर काही ठिकाणी उघड युती आहे.”
“जो पेजेला देईल, त्याच्या शेजेवर…”
काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करणाऱ्या भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात अर्धी काँग्रेस भाजपनेच पचवली आहे. सत्तेसाठी भाजपला कोणीही चालते. “जो पेजेला (मदत) देईल, त्याच्या शेजेवर चढायला भाजप सदैव तयार असते,” अशी टोकदार टीका करत त्यांनी भाजपच्या सत्तेच्या हव्यासावर बोट ठेवले.


