
Chhatrapati Sambhajinagar Saree Offer: आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक रस्ता जाम; रीलस्टार्सच्या मार्केटिंगमुळे एकच झुंबड; पोलिसांनी दुकान पाडले बंद
छत्रपती संभाजीनगर | येथील त्रिमूर्ती रोडवर एका नवीन साडी सेंटरच्या उद्घाटनावेळी साड्यांवरील अवाढव्य सवलतीमुळे महिलांची अलोट गर्दी उसळली. सोशल मीडियावरील ‘रील्स’च्या माध्यमातून झालेल्या जाहिरातीमुळे तब्बल 1000 हून अधिक महिला एकाच वेळी दुकानावर तुटून पडल्या. या गर्दीत निर्माण झालेल्या चेंगराचेंगरीत तीन महिलांना श्वास घेण्यास त्रास होऊन त्या जागीच बेशुद्ध पडल्या, तर काही लहान मुले आपल्या मातांपासून दुरावल्याने गोंधळ उडाला.
रील्सचा परिणाम अन् अलोट गर्दी
गेल्या तीन महिन्यांपासून स्थानिक रीलस्टार्समार्फत या साडी सेंटरच्या ऑफर्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते. 5 हजार रुपयांची साडी 599 रुपयांत आणि काही साड्या 199 रुपयांत मिळणार, असे दावे या व्हिडिओंमध्ये करण्यात आले होते. त्याचाच परिणाम म्हणून रविवारी सकाळी 10 वाजेपासूनच महिलांनी दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर
सकाळी 11 वाजता दुकानाचे उद्घाटन होऊन दरवाजा उघडताच, आत शिरण्यासाठी महिलांमध्ये प्रचंड ओढाताण झाली. यामुळे दुकानात खेळती हवा नसल्याने घुसमट सुरू झाली. अनेक महिलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तीन जणी बेशुद्ध पडल्या. या गोंधळात रस्ता पूर्णपणे जाम झाला आणि वाहतूक विस्कळीत झाली.
पोलिसांची धाव अन् ऑफरची ‘थट्टा’
घटनेचे गांभीर्य ओळखून जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने दुकान बंद पाडले. “ही ऑफर केवळ आजपुरती नसून वर्षभर राहणार आहे,” असे आवाहन पोलिसांनी माईकवरून वारंवार केल्यानंतर आणि बळाचा वापर करण्याचा इशारा दिल्यानंतर दुपारी 2 वाजता गर्दी पांगवण्यात पोलिसांना यश आले.


