Ratnagiri ACB Trap News : रत्नागिरीत लाचखोर तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात; 7/12 वर नाव लावण्यासाठी मागितली 10 हजारांची लाच

Ratnagiri ACB Latest Bribe Case :,सजा चाफेच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले; नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘एसीबी’चा दणका
रत्नागिरी | रत्नागिरी तालुक्यातील सजा चाफे येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) बजरंग दत्तात्रय चव्हाण यांना 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. 7/12 उताऱ्यामध्ये फेरफार नोंद करून नावाची नोंदणी केल्याची प्रत देण्यासाठी चव्हाण यांनी या लाचेची मागणी केली होती. Ratnagiri Latest Bribe News
नेमके प्रकरण काय?
तक्रारदार यांनी मौजे आगरनरळ येथे 10 गुंठे बिनशेती जमीन खरेदी खताद्वारे विकत घेतली होती. या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर स्वतःचे नाव लावण्यासाठी त्यांनी 9 ऑक्टोबर 2025 रोजी तलाठी कार्यालय चाफे येथे विहित नमुन्यात अर्ज केला होता. मात्र, फेरफार नोंद करून 7/12 उताऱ्याची प्रत देण्यासाठी तलाठी बजरंग चव्हाण यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
सापळा रचून केली अटक
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 31 डिसेंबर 2025 रोजी रत्नागिरी ‘एसीबी’ कार्यालयात तक्रार नोंदवली. या तक्रारीची 1 जानेवारी 2026 रोजी पडताळणी करण्यात आली असता, चव्हाण यांनी लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार चाफे येथील तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून 10 हजार रुपये स्वीकारताना तलाठी बजरंग चव्हाण यांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.
अधिकारी आणि पथक
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे, सुहास शिंदे आणि रत्नागिरी घटकाचे पोलीस उप अधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


