Pune News : पुण्यात ‘अजितदादा’ गटाची मोठी खेळी! गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे रिंगणात; रुपाली पाटलांना दोन ‘एबी फॉर्म’

•गुंडगिरीच्या आरोपांमुळे पुणे हादरले; मुरलीधर मोहोळ यांच्याशी जुन्या वादाचा संदर्भ; शेवटच्या दिवशी पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा
पुणे | पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस नाट्यमय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने घेतलेल्या दोन निर्णयांमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कुख्यात गुंड गजानन (गजा) मारणे याची पत्नी जयश्री मारणे हिला पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली असून, दुसरीकडे आक्रमक नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना दोन ठिकाणांहून लढण्याची संधी दिली आहे.
जयश्री मारणे यांची प्रभाग 10 मधून उमेदवारी
कुख्यात गुंड गजा मारणे सध्या कारागृहात असताना, त्याच्या पत्नीला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने प्रभाग 10 मधून उमेदवारी दिली आहे. या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये कोथरूडमध्ये एका आयटी इंजिनिअरला (जो केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाशी संबंधित होता) मारणे टोळीकडून मारहाण झाली होती. या प्रकरणात गजा मारणेवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी गुन्हेगारांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असताना, त्यांच्याच मित्रपक्षाने (अजित पवार गट) गुंडाच्या पत्नीला तिकीट दिल्याने महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस होण्याची शक्यता आहे.
रुपाली ठोंबरे पाटील यांना दोन ठिकाणांहून उमेदवारी
पक्षांतर्गत वाद आणि रूपाली चाकणकर यांच्याशी असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रुपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. अखेर पक्षाने त्यांचे पुनर्वसन करत त्यांना दोन ‘एबी फॉर्म’ दिले आहेत.
प्रभाग २५ अ (शनिवार पेठ-मंडई)
प्रभाग २६ ब (गुरुवार पेठ-घोरपडी पेठ) एकाच वेळी दोन प्रभागातून उमेदवारी मिळाल्याने रुपाली पाटलांचे पक्षातील वजन वाढल्याचे दिसत आहे.
आंदेकर टोळीचेही निवडणुकीत आगमन?
पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले केवळ मारणे कुटुंबच नाही, तर आंदेकर टोळीशी संबंधित व्यक्तींनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे पुणे महानगरपालिकेची ही निवडणूक ‘बॅलेट’सोबतच ‘बुलेट’च्या चर्चेने गाजण्याची भीती व्यक्त होत आहे.



