Girish Mahajan On BJP Politician : 1000 इच्छुकांमुळे भाजपची गोची; “हा प्रकार अतिशय चुकीचा,” गिरीश महाजनांनी कडक शब्दांत फटकारले
नाशिक | नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या Nashik BMC Election रणधुमाळीत भाजपमध्ये उमेदवारीवरून मोठा राडा झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्म मिळवण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी चक्क भाजप नेत्यांच्या गाड्यांचा पाठलाग केल्याची धक्कादायक घटना घडली. या गोंधळामुळे नाशिकचे राजकीय वातावरण तापले असून, गिरीश महाजन यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कारवाईचा इशारा दिला आहे.
नेमका प्रकार काय घडला?
नाशिकमध्ये भाजपच्या एबी फॉर्मचे वाटप सुरू असताना इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती. 122 जागांसाठी तब्बल 1 हजार उमेदवार इच्छुक असल्याने पक्षाची मोठी ओढाताण झाली. अनेकांना आपल्याला तिकीट मिळणार नाही अशी भीती वाटू लागली. जेव्हा पदाधिकारी गाडीतून एबी फॉर्म घेऊन निघाले, तेव्हा आपला फॉर्म राहून जाऊ नये या भीतीने अनेक कार्यकर्त्यांनी दुचाकी आणि गाड्यांवरून नेत्यांच्या गाडीचा पाठलाग केला. हा पाठलाग केवळ रस्त्यावरच मर्यादित राहिला नाही, तर काही ठिकाणी शाब्दिक चकमक आणि रेटारेटीचेही प्रकार घडले.
गिरीश महाजन यांची तिखट प्रतिक्रिया
या गोंधळानंतर पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “नाशिकमध्ये जे घडले ते अतिशय चुकीचे आहे. जागा कमी आणि इच्छुकांची संख्या अफाट असल्याने हा पेच निर्माण झाला. जर आमचे पदाधिकारी फॉर्म घेऊन कार्यालयाकडे निघाले नसते, तर वेळेत फॉर्म पोहोचवणे अशक्य झाले असते. पण 100-150 लोकांनी अशा प्रकारे गाड्यांचा पाठलाग करणे, मारामारी करणे हे पक्षाच्या शिस्तीला धरून नाही.”
कारवाईचा बडगा उगारणार
गिरीश महाजन यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. “या कार्यकर्त्यांच्या मागे कोण होते? त्यांना चिथावणी देणारे मुख्य सूत्रधार कोण आहेत? याची सखोल चौकशी केली जाईल. मी स्वतः यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.


