मुंबई

लालबाग-परळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ‘फायर’ ब्रँड खेळी; माजी महापौर श्रद्धा जाधवांना शिवसैनिकांचा विरोध, तर अनिल कोकीळ यांचा पत्ता कट!

दादरमध्ये मनसेच्या किल्लेदारांमुळे बंडाळी; ठाकरे गटाचे प्रकाश पाटणकर शिंदे सेनेत, तर सरवणकरांचे समर्थकही नाराज

मुंबई | शिवसेनेचा जन्म झालेल्या आणि जिथे विजय हमखास मानला जातो, त्या लालबाग-परळ आणि दादर परिसरात उमेदवारी जाहीर होताच शिवसैनिकांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिल्याने चक्क ‘फायर आजीं’सह निष्ठावान शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गोंधळ घातला, तर दादरमध्ये महायुती आणि ठाकरे-मनसे युतीमुळे अंतर्गत बंडाळी उफाळून आली आहे.

शिवडी-लालबाग: निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप

शिवडी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत

प्रभाग 202: माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खरं तर त्यांचे चिरंजीव पवन जाधव इच्छुक होते, मात्र स्थानिक शाखाप्रमुखांचा विरोध असतानाही श्रद्धा जाधवांनाच मैदानात उतरवले. यामुळे संतप्त शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर ‘श्रद्धा जाधवांना उमेदवारी का?’ असा सवाल करत जोरदार घोषणाबाजी केली.

प्रभाग 204: बेस्टचे माजी अध्यक्ष अनिल कोकीळ यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी ‘मुंबईचा राजा’ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांना उमेदवारी देऊन ठाकरेंनी नवीन चेहरा दिला आहे.

प्रभाग 203: माजी आमदार दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ इच्छुक होत्या, मात्र येथे भारती पेडणेकर यांना संधी देण्यात आली आहे.

दादरमध्ये पक्षांतराचा ‘धडाका’

दादरमध्ये (प्रभाग 192) मनसेकडून यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी जाहीर झाल्याने ठाकरे सेनेत मोठा भूकंप झाला. ठाकरे गटाचे प्रकाश पाटणकर यांनी तातडीने पक्षाला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि तिथून एबी फॉर्मही मिळवला.

शिंदे सेनेतही नाराजीचा सुरु
केवळ ठाकरे गटातच नाही, तर शिंदे यांच्या शिवसेनेतही दादरमध्ये वाद सुरू झाला आहे. आमदार सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक आणि विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर यांचा ऐनवेळी पत्ता कट झाल्याने सरवणकर गट नाराज झाला आहे. निकेत पाटील आणि अभिजित राणे या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला निर्वाणीचा इशारा दिला असून, दादरमध्ये शिंदे सेनेला या अंतर्गत वादाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

‘मातोश्री’बाहेर शिवसैनिकांचा राडा

श्रद्धा जाधवांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी लालबाग-परळमधील शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्रीवर धडकले. “जेव्हा कठीण काळ होता तेव्हा शाखाप्रमुख आणि सामान्य शिवसैनिक उभा राहिला, मग आता उपऱ्या उमेदवारांना का झुकते माप दिले जात आहे?” असा सवाल उपस्थित करत कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना धारेवर धरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0