Prakash Mahajan : प्रकाश महाजन यांच्या हाती ‘धनुष्यबाण’ ; ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश

• मनसे सोडल्यानंतर 3 महिन्यांनी घेतला मोठा निर्णय; महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना धक्का
ठाणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी अखेर आपली नवीन राजकीय वाटचाल निश्चित केली आहे. ठाणे येथे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते अधिकृतपणे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. काल त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली, ज्याला उपमुख्यमंत्र्यांनी संमती दिली आहे.

13 सप्टेंबरला दिला होता राजीनामा
प्रकाश महाजन यांनी 13 सप्टेंबर रोजी मनसेच्या प्रवक्तेपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्षांतर्गत निर्णयप्रक्रियेवर नाराज असल्याची चर्चा होती. विशेषतः, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्षाची बदलती भूमिका यावरून त्यांचे मतभेद टोकाला पोहोचले होते.राजीनामा दिल्यानंतर तीन महिने त्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली होती, मात्र आता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शिक्कामोर्तब
काल मुंबईत प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि उपमुख्यमंत्री राबवत असलेल्या विकासकामांवर विश्वास दर्शवत शिवसेनेत काम करण्याची तयारी दर्शवली. महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजलेले असताना प्रकाश महाजन यांच्यासारखा अनुभवी आणि आक्रमक नेता सोबत येणे, हा शिंदे गटासाठी मोठा फायदा मानला जात आहे.
मनसेसाठी मोठा धक्का
राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि प्रमोद महाजन यांचे बंधू असल्याने प्रकाश महाजन यांचे मनसेमध्ये मोठे वजन होते. विशेषतः मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात त्यांची चांगली पकड आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घेतलेला हा निर्णय मनसेच्या संघटनात्मक बांधणीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.


