
PCMC Political Latest News : अजित पवार गटाशी चर्चा कार्यकर्त्यांच्या मागणीनुसारच”; रोहित पवारांची महत्त्वाची विधाने
पिंपरी-चिंचवड | आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाशी सुरू असलेल्या चर्चेवर आमदार रोहित पवार यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. “आघाडीबाबतचे अंतिम चित्र येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल,” असे त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर त्यांनी सावध प्रतिक्रिया देत, अशी कोणतीही अधिकृत चर्चा गेल्या तीन वर्षांपासून नसल्याचे स्पष्ट केले.
आघाडीचा निर्णय कोणाच्या हाती?
रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करून अजित पवार गटाशी चर्चा केली जाईल. या चर्चेचा तपशील प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांना दिला जाईल. त्यांच्या मान्यतेनंतरच खासदार डॉ. अमोल कोल्हे आघाडीबाबतची अधिकृत घोषणा करतील. विशेष म्हणजे, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये खुद्द शरद पवार थेट लक्ष घालत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
हेलिपॅडवर कारची तपासणी आणि रोखठोक टीका
पिंपरी-चिंचवडमध्ये रोहित पवार यांच्या वाहनाची पोलिसांनी तपासणी केली. त्यावर टोला लगावताना रोहित पवार म्हणाले,”सत्ताधारी नेते हेलिकॉप्टरमधून फिरताना काळ्या रंगाच्या पैशांच्या मोठ्या पिशव्या घेऊन जातात, त्यांची चौकशी पोलीस का करत नाहीत? आमच्या वाहनात तर लाडू आणि चिवड्याशिवाय काहीच सापडणार नाही.”
प्रशांत जगतापांचा राजीनामा ‘भावनिक’
पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी (SP) पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, जगताप हे अत्यंत प्रामाणिक आणि विचारांचे पक्के कार्यकर्ते आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय हा वैयक्तिक आणि भावनिक आहे.
राहुल कलाटेंच्या भाजप प्रवेशावर डॉ. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे (SP) स्थानिक नेते राहुल कलाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यावर भाष्य केले. “कलाटे यांचा निर्णय योग्य की अयोग्य हे येणारा काळच ठरवेल. भाजपने पिंपरी-चिंचवड शहराची विभागणी केली असून स्थानिक नेतृत्व भ्रष्टाचारी आहे. त्यांना हद्दपार करणे हेच आमचे प्राधान्य असेल,” असे कोल्हे यांनी ठणकावून सांगितले.



