मुंबईठाणे
Trending

Navi Mumbai Mira Bhayandar Political News : ठाकरेंच्या घोषणेपूर्वीच महायुतीचे ‘काउंटर’! एमएमआरमध्ये शिंदे-भाजप युतीवर शिक्कामोर्तब

Navi Mumbai Mira Bhayandar Political News : उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 5 तास खलबतं; नवी मुंबई, मिरा-भाईंदरचा पेच सोडवण्यासाठी ‘फिल्डिंग’

ठाणे | एकीकडे मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होत असताना, दुसरीकडे महायुतीनेही मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिंदेसेनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये मंगळवारी रात्री उशिरापर्यंत तब्बल पाच तास मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीत एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांमध्ये युती करण्यावर एकमत झाले असून, जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.

रस्सीखेच संपली, आता समन्वयावर भर

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर या महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदेसेनेत जागांवरून मोठी रस्सीखेच सुरू होती. ठाण्यात भाजप 42 जागांसाठी आग्रही आहे, तर कल्याण-डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातील राजकीय स्पर्धा सर्वश्रुत आहे. या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बैठकीनंतर खासदार नरेश म्हस्के यांनी माहिती दिली की, “चर्चा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सर्व महापालिकांमध्ये एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे.”

स्थानिक पेच सोडवण्यासाठी विशेष रणनीती

बैठकीत काही कळीच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली:
कल्याण-डोंबिवली: श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील मतभेद बाजूला सारून युती धर्म पाळण्याचे संकेत.

नवी मुंबई: गणेश नाईक यांची युतीबाबतची नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जाणार.

मिरा-भाईंदर: आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी बैठकीत खल झाला.

काय ठरला फॉर्म्युला?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएमआर क्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत महायुती तुटता कामा नये, असा कडक आदेश दोन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींनी दिला आहे. येत्या दोन दिवसांत स्थानिक पातळीवर प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे. जागावाटपाची अधिकृत घोषणा लवकरच एका संयुक्त पत्रकार परिषदेत केली जाईल, अशी शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0