Thane News : ठाण्यात अजितदादांना धक्का! महिला कार्याध्यक्षा मनिषा भगत यांचा शेकडो समर्थकांसह शरद पवार गटात प्रवेश

•उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच मुंब्र्यात राजकीय उलथापालथ; जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत बांधले ‘तुतारी’चे बंधन
ठाणे | राज्यात 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला मोठा हादरा बसला आहे. पक्षाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा मनिषा भगत यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षांतरामुळे मुंब्रा आणि ठाणे परिसरात अजित पवार गटाची मोठी पडझड झाल्याचे मानले जात आहे.
विकासकामांच्या मुद्द्यावरून ‘स्वगृही’ परतल्या
मनिषा भगत यांनी 2023 मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, वर्षभरातच त्यांनी पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. मुंब्रा येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना त्या म्हणाल्या, “जितेंद्र आव्हाड यांनीच मुंब्रा परिसराचा खरा विकास केला आहे. केवळ राजकारणासाठी या विकासकामांकडे दुर्लक्ष करणे मला पटले नाही. त्यामुळेच मी पुन्हा विकासाच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला.” ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
महापालिका निवडणुकीचे रणशिंग
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार:
मतदान: 15 जानेवारी 2026
मतमोजणी: 16 जानेवारी 2026
अर्ज भरण्यास सुरुवात: 23 डिसेंबर 2025
उमेदवारी अर्जापूर्वी पक्षांतराचे वारे
23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने अनेक इच्छुक उमेदवार आपल्या राजकीय भवितव्यासाठी पक्षांतर करत आहेत. एकीकडे भाजपमध्ये मोठी ‘इनकमिंग’ सुरू असतानाच, ठाण्यात मात्र शरद पवार गटाने अजित पवार गटाला दिलेला हा धक्का चर्चेचा विषय ठरला आहे. मुंब्रा आणि कळवा पट्ट्यात आपली ताकद टिकवून ठेवण्यात जितेंद्र आव्हाड यांना यश येत असल्याचे या पक्षप्रवेशावरून दिसून येते.


