
Sanjay Raut On Raj And Uddhav : महायुतीला ‘दिल्लीच्या पायावर डोकं ठेवणारे’ म्हणून डिवचले; काँग्रेसच्या ‘वेगळ्या चुली’वर स्पष्ट नाराजी; संयुक्त महाराष्ट्राचा लढा मुंबईतून सुरू करणार
मुंबई :- राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच्या तोंडावर खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी आज मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीबद्दल विचारले असता, त्यांनी थेट ‘येत्या आठवड्यात युतीची अधिकृत घोषणा व्हायला हरकत नाही’ असा गौप्यस्फोट केला आहे. राऊत यांनी स्पष्ट केले की, “या क्षणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत.” मुंबई महापालिका, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक अशा प्रमुख महापालिकांमध्ये दोन्ही ठाकरे गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीवर बोचरी टीका
युतीच्या प्रश्नावर महायुतीला डिवचताना राऊत म्हणाले की, युतीची घोषणा कधी करणार, हे आम्हाला विचारण्याऐवजी “महायुतीला विचारा, जे दिल्लीत जाऊन अमित शाहंच्या पायावर डोकं ठेवतात, ‘आमच्याशी युती करा, युती करा’ असं सांगत फिरतात.”
काँग्रेसला थेट इशारा
या निवडणुकीत काँग्रेसच्या भूमिकेबद्दल राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. “काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं दिसत नाही. बिहारच्या निकालानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना थेट इशारा दिला: “स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचं आवाहन असेल, तुम्ही वेगळी चूल मांडून भाजपला मदत होईल अशी भूमिका घेऊ नये.”
लढाई मुंबईची
राऊत यांनी स्पष्ट केले की, ही केवळ 29 महापालिकांची लढाई नसून, मुंबईची लढाई आहे. “संयुक्त महाराष्ट्राचा लढा 1956 साली सुरू झाला, तो मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी होता. आम्ही मुंबई अमित शाहंच्या घशात जाऊ देणार नाही,” असे म्हणत त्यांनी निवडणुकीला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे स्वरूप दिले आहे.


