Devendra Fadnavis : “पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत!” – महापालिका निवडणुकीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis On PCMC Election : मुंबईसह सर्वत्र शिंदेंची शिवसेना-भाजप युती; ‘एकत्र लढल्यास विरोधकांना फायदा’ या धोरणाने पुण्यातील समीकरणे बदलली; विजयाचा विश्वास व्यक्त
मुंबई :- राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी लगेचच पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल लागणार असलेल्या या निवडणुकीत महायुती सरकारने केलेल्या कामामुळे जनतेचा कौल आपल्याच बाजूने असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीतील युतीच्या भूमिकेबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती दिली, ज्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
युतीचे धोरण स्पष्ट
शिंदे गट-भाजप युती: राज्यातील बहुतांश ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे. नगरपालिका निवडणुकीत विरोधात लढलेले हे दोन पक्ष महापालिकेत मात्र एकत्र दिसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये वेगळे सूत्र”
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (NCP) हे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
‘मैत्रीपूर्ण लढत’ का?
या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे का लढत आहेत, यावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला:
“पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप हे एकत्र लढू शकणार नाहीत. त्यावर अजितदादांशी चर्चा झाली आहे. आम्ही जर एकत्र लढलो तर त्याचा फायदा हा विरोधकांना होणार हे इतकं राजकारण आम्हाला दोघांनाही समजतं. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार असून ती मैत्रीपूर्ण लढत असेल.”
मतदार यादीतील घोळावर मत
विरोधकांनी उपस्थित केलेल्या मतदार यादीतील घोळाच्या आरोपांवरही फडणवीस यांनी भाष्य केले. “थोड्या काही प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोळ असतो, ते आम्हीही दाखवलं आहे. पण त्यामुळे निवडणूकच घ्यायच्या नाहीत हे मत चुकीचं आहे,” असे ते म्हणाले. एसआयआर (SIR) प्रक्रियेमुळे भविष्यात याद्यांमधील घोळ कमी होईल, तसेच निवडणूक आयोगाने पुढील काळात या याद्या ब्लॉक चेनमध्ये टाकल्यास सगळा घोळ संपेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.



