Pune Police : महापालिका निवडणुकीपूर्वी पिंपरी-चिंचवड पोलिसांची ‘धडक’ कारवाई! – दहशत माजविणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना ‘एमपीडीए’खाली 1 वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध

PCMC Police Latest News : खून, दरोडा, खंडणी मागणाऱ्यांचा अभिलेख तपासला; आयुक्त विनयकुमार चौबे यांची मोठी कारवाई, चालू वर्षात 28 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई
पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवड पोलीस PCMC Police आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहोचवून दहशत निर्माण करणाऱ्या धोकादायक गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या (PCMC Election) पार्श्वभूमीवर आयुक्तांनी महाराष्ट्र प्रतिबंधक स्थानबद्धता (MPDA) कायद्यान्वये तीन सराईत गुन्हेगारांना एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
पोलीस आयुक्त चौबे यांनी हद्दीतील खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, गावठी दारू विक्री, तडीपारीचा भंग आणि घातक शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस ठाणे स्तरावर गुन्हेगारांचा अभिलेख तपासून ही कारवाई करण्यात आली.
स्थानबद्ध करण्यात आलेले गुन्हेगार
साकीब रफीक शेख (वय 30, दापोडी): या सराईत गुन्हेगारावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, घातक हत्यार जवळ बाळगणे यांसारखे तीन गंभीर गुन्हे दाखल होते.
आकाश सुभाष आल्हाट (29, रावेत): या अट्टल गुन्हेगाराने त्याच्या साथीदारांसह दरोडा, जबरी चोरी आणि गावठी हातभट्टी दारू विक्री यांसारखे दहा गंभीर गुन्हे केले होते.
नागेश गोपीनाथ शिंदे (39, म्हाळुंगे एमआयडीसी): याने खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि गर्दी मारामारी यांसारखे पाच गंभीर गुन्हे केले होते.
पोलीस आयुक्तांनी या तिन्ही गुन्हेगारांचे प्रस्ताव आणि कागदपत्रे तपासून त्यांना एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षाच्या कालावधीसाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, साकीब शेख आणि आकाश आल्हाट यांना छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील हरसूल मध्यवर्ती कारागृह, तर नागेश शिंदे यास नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तांनी अवलंबिलेल्या या कडक धोरणांतर्गत, चालू वर्षात एमपीडीए कायद्यान्वये एकूण 28 कारवाया करण्यात आलेल्या आहेत.



