मुंबई

Raj Thackeray : कष्टकऱ्यांचा विठ्ठल हरपला! – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे 95 व्या वर्षी निधन

•असंघटित कामगारांसाठी आयुष्य वेचले; हमाल, रिक्षाचालक आणि सफाई कामगारांच्या पेन्शनसाठी उभारला होता मोठा लढा; राज ठाकरे यांची भावनिक पोस्ट

मुंबई :- सत्यशोधक आणि समाजवादी विचारांचे प्रखर पुरस्कर्ते, तसेच असंघटित मजुरांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे नेते बाबा आढाव यांचे काल (सोमवारी, 8 डिसेंबर) वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर पुण्यातील पुना हॉस्पिटमध्ये उपचार सुरू होते, दरम्यान उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.बाबा आढाव यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील एका महान पर्वाचा अंत झाला असून, कष्टकऱ्यांमध्ये ‘कष्टकऱ्यांचा विठ्ठल हरपला’ अशी शोकभावना व्यक्त केली जात आहे.

राज ठाकरे यांची भावनिक प्रतिक्रिया

बाबा आढाव यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक आणि कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या बाबा आढावांचं निधन झालं. महाराष्ट्राने या देशांत समाज प्रबोधनाचा सज्जड पाया घातला आणि सामाजिक कार्यकर्यांच मोहोळ तयार केलं. त्यातलं एक अत्यंत महत्वाचं नाव बाबा आढाव.

बाबा आढाव हे पेशाने डॉक्टर. पण डॉक्टरकीचा व्यवसाय सोडून त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात ढकलून घेतलं. महाराष्ट्राचं हे एक वैशिष्ट्य की, सामाजिक क्षेत्रांत उत्तुंग कार्य केलेली माणसं, उच्चशिक्षित आणि जर त्यांनी त्यांच्या क्षेत्रांत करिअर करायचं ठरवलं असतं तर तितकीच मोठी कारकीर्द घडवू शकले असते अशी माणसं सामाजिक क्षेत्रांत आली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला आकार दिला. हल्ली अशी माणसं तयार होत आहेत का ? माहित नाही. हल्ली सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवणारे, स्वतःचे तशा नावाचे फ्लेक्स लावणाऱ्यांचा सुळसुळाट आहे.

असो, पण रिक्षा पंचायत असो, हमाल पंचायत असो की 1972 साली एक गाव एक पाणवठासाठी उभी केलेली चळवळ असो, की 1969 ला राज्यात मंजूर झालेला महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा असो, हे बाबांचं मोठं योगदान.

बाबा आढावांनी संपूर्ण आयुष्य कष्टकरी, असंघटित कामगार आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी संघर्ष उभा केला. आर्थिक उदारीकरणाच्या नंतरच्या काळात कामगारांचं आणि श्रमिकांच शोषण करणारी एक नवी व्यवस्था आता जन्माला आली आहे. आणि जिला सरकारचं समर्थन आहे. सध्या तर सरकारं ही उद्योगशरण आहेत आणि कामाचे तास, वेळा याबाबत सरकार उद्योगजगताला शिस्त देखील लावू शकत नाही, हे नुकत्याच विमान कंपनीच्या उदाहरणातून दिसलं. यामुळे संघटित असो की असंघटित कामगार किंवा नव्याने उदयाला येत असलेला ज्याला ‘गिग वर्कर’ म्हणता येईल असे सगळेच असुरक्षतितेच्या गर्तेत सापडले आहेत.

बाबा आढावांची एकूणच समाजकारणाकडे बघण्याची भूमिका व्यापक होती आणि त्यामुळेच ईव्हीएमच्या विरोधात वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. हे खरं समाजकारण जे एनजीओ संस्कृती उदयाला येण्याच्या आधीच्या काळातलं, जिथे प्रत्येक विषयात मतं होती आणि ठोस भूमिका होती. बाबा आढावांसारखी माणसं परत या राज्यात कधी होतील ? माहित नाही, पण ती घडवण्याची शक्ती या भूमीत नक्की आहे, त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा.

बाबा आढावांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. राज ठाकरे ।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0