
Ambadas Danve ON MAHENDRA Dalvi : “शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, पण हे आमदार पैशांच्या गड्ड्यांसोबत काय करत आहेत?” – अधिवेशनात मोठा गदारोळ होण्याची शक्यता; आमदार महेंद्र दळवी यांचा इन्कार, “ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा!”
नागपूर :- महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज सकाळी त्यांच्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर तीन गंभीर व्हिडीओ शेअर करून राज्यात राजकीय खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडीओंद्वारे त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर अप्रत्यक्षपणे नोटांच्या बंडलांसह दिसल्याचा दावा केला असून, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केला आहे.
दानवेंच्या पोस्टमध्ये काय?
अंबादास दानवे यांनी मंगळवारी सकाळी 7 वाजता ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी फडणवीस, शिंदे आणि भाजपला टॅग करत म्हटले आहे.“या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी, हे आमदार कोण आहेत? आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?”
व्हिडीओंमध्ये काय आहे?
दानवे यांनी शेअर केलेल्या तीन व्हिडीओपैकी दोन व्हिडीओंमध्ये मोठ्या प्रमाणावर नोटांची बंडलं (गड्डे) दिसत आहेत. तर तिसऱ्या व्हिडीओमध्ये शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती दिसत आहे. हे तिन्ही व्हिडीओ दुसऱ्या मोबाईलवरून शूट केलेले आहेत.
आमदार महेंद्र दळवी यांचा इन्कार
तिसऱ्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीबद्दल स्पष्टीकरण देताना आमदार महेंद्र दळवी यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना तीव्र भूमिका मांडली.दळवी म्हणाले की, पहिल्या दोन व्हिडीओमधील लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला व्यक्ती कोण आहे, ते दानवेंनी दाखवावे.”मी जर असेन तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. ब्लॅकमेल करणं हा अंबादास दानवेंचा धंदा आहे,” असा पलटवार दळवींनी केला.”माझा त्या व्हिडीओंशी काहीही संबंध नाही. माझं त्यांना खुलं आव्हान आहे. हा व्हिडीओ माझा नाही. अंबादास दानवेंना मला बदनाम करण्यासाठी कुणी सुपारी दिली हे त्यांनी सांगावं,” असे दळवी म्हणाले.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे व्हिडीओ समोर आल्याने, आज सभागृहात याचे तीव्र पडसाद उमटण्याची आणि सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार वाद होण्याची शक्यता आहे.



