Nashik News : ‘निवडून दिलं म्हणजे सगळे अधिकार मिळाले नाहीत’! – नाशिक वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंची रोखठोक भूमिका; राजकारण तापले

Nashik Latest News : “50 फूटी झाडं तोडायची आणि नवीन लावायची ही पळवाट नको”; अजित पवारांचा पाठिंबा, तर फडणवीसांकडून ‘राजकीय पर्यावरणवादी’ टीका
नाशिक :- आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकमधील तपोवन परिसरात होणाऱ्या प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांनी अत्यंत ठाम आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. त्यांनी या निर्णयावर थेट प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारला आहे. “तुम्हाला निवडून दिलं म्हणजे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत असं नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सयाजी शिंदेंची भूमिका
शिंदे यांनी या वृक्षतोडीला विरोध करत जागरूक नाशिककरांना पाठिंबा दिला. ते म्हणाले, “जिथे झाडं तुटतील तिथे आपण उभं राहिलं पाहिजे. मोठी झाडं तोडायची आणि नवीन झाडं लावायची हे चूक आहे. काही माणसं मारायची आणि त्यांना मूल बक्षीस म्हणून द्यायचं, असं कुठे होतं का?” असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला केला. Sayaji Shinde angry on Government over Cutting Trees in Tapovan
झाडांना प्राधान्य: राजकारणाबद्दल अभ्यास नसला तरी झाडांबद्दल राजकारण करू नका, असे सांगत, “झाडांचा आधी विचार नंतर माणसांचा विचार केला पाहिजे. सगळी झाडे जगली पाहिजेत,” अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली.
सदावर्ते यांना प्रत्युत्तर: ‘साधू आले-गेले काही फरक पडत नाही, पण झाडं गेली तर फरक पडतो’ या त्यांच्या विधानावर गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली होती. त्यावर शिंदे यांनी ‘आपण आपले बरे आहोत तिथे खरे’ असे म्हणत अधिक बोलणे टाळले.
राजकीय प्रतिक्रिया आणि वादंग:
सयाजी शिंदेंच्या या भूमिकेमुळे राजकारण तापले आहे:
अजित पवार यांचा पाठिंबा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत सयाजी शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. “तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. ही भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही काळाजी गरज आहे,” असे त्यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांची टीका: तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली. “कुंभमेळा हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, पर्यावरणही महत्त्वाचं आहे. पण, काही लोकं राजकीय कारणानंदेखील पर्यावरणवादी बनले आहेत. काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावेत, अशा लोकांना आम्ही सांगतो की अडथळे येऊ देणार नाही,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
कलाकार मैदानात
सयाजी शिंदेंसोबतच नाशिकमधील अनेक नाट्य, चित्रपट, संगीत कला क्षेत्रातील कलाकार मंडळींनी एकत्र येत निषेध आंदोलन केले. अभिनेत्री अनिता दाते आणि चिन्मय उदगीरकर यांच्यासह अनेक कलाकारांनी ‘तपोवन वाचवा, तपोवन वाढवा’ हा नारा देत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.


