नागपूर अधिवेशनात सुट्टी रद्द! – 8 ते 14 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन; दोन्ही सभागृहांमध्ये सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू राहणार

Maharashtra Winter Session : संविधानाच्या अमृत महोत्सवावरील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे पुस्तक 9 डिसेंबरला प्रकाशित होणार; तयारीला वेग
मुंबई :- महाराष्ट्र विधिमंडळाचे आगामी हिवाळी अधिवेशन Maharashtra Winter Session सोमवार, 8 डिसेंबर 2025 ते रविवार, 14 डिसेंबर 2025 या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यावेळी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशनाच्या कालावधीत शनिवार (13 डिसेंबर) आणि रविवार (14 डिसेंबर) या शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज घेण्याचा निर्णय झाला आहे. Maharashtra Winter Session
या अधिवेशनादरम्यान, भारताच्या संविधानाच्या गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचालीनिमित्त विधानसभेत झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले होते. त्यांच्या भाषणाचे पुस्तक स्वरूपातील संकलन महाराष्ट्र विधिमंडळ वि.स. पांगे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या पुढाकारातून करण्यात आले असून, या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार, 9 डिसेंबर 2025 रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
विधानभवन येथे आयोजित बैठकीला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते.


