
Navi Mumbai Crime News : रेल्वे ब्रिज साईटवरील जबरी चोरी आणि घरफोडीचा पर्दाफाश; लाखोंचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी गुन्हेगारीचे कंबरडे मोडले
नवी मुंबई/पनवेल :- नवी मुंबई गुन्हे शाखा, कक्ष-3 (पनवेल) Navi Mumbai Crime Branch Unit 3 यांनी धडाकेबाज कामगिरी करत जबरी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांतील दोन वेगवेगळ्या टोळ्यांमधील 4 अट्टल चोरट्यांना अटक करून मोठी यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे रायगड, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील मिळून एकूण ९ गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Navi Mumbai Robbery News
जबरी चोरीचा पहिला गट जेरबंद
पनवेलमधील उरण ते गव्हाणफाटा रस्त्यावरील रेल्वे ब्रिजच्या बांधकाम साईटवर बोलेरो पिकअपसह येऊन वॉचमनचे हात बांधून त्याला मारहाण करून लोखंडी बांधकाम साहित्य चोरून नेल्याच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेने लावला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सीबीडी बेलापूर येथून समशेर शेर खान आणि कुलदिप बच्चु सिंग या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी पनवेल शहर, कामोठे आणि उलवा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बांधकाम साहित्याच्या चोरीचे एकूण 6 गुन्हे केल्याची कबुली दिली.
घरफोडीचा दुसरा गट गजाआड
दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण कारवाईत, कळंबोली येथील घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी सलिम मोहम्मद शेख आणि तौफिक मोहम्मद शेख या दोन आरोपींना अंबरनाथ येथून अटक केली. कळंबोली, पनवेल आणि तळोजा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या टोळीचा छडा लावण्यात आला. या आरोपींनी कळंबोलीतील घरफोडीसह नेरळ (रायगड) आणि कुडाळ (सिंधुदुर्ग) येथील मिळून एकूण 3 घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.
त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
गुन्हे शाखा, कक्ष-3 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत या दोन टोळ्यांना गजाआड केले.



