
Aditya Thackeray On EC : एकाच मतदाराचे 8 वेळा नाव, मराठी मतदारांची दुबार नावे अधिक; “बीएलओ म्हणून निरक्षर लोक काम करत आहेत
मुंबई :- मुंबई महापालिकेच्या Mumbai BMC Election 20 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठा गोंधळ आणि त्रुटी असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे. आमदार सुनील गोविंद शिंदे यांचे 7 वेळा, तर माजी नगरसेविका श्रद्धा जाधव यांचे तब्बल 8 वेळा यादीत नाव आल्याचे उदाहरण देत त्यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले.
यादीतील गंभीर त्रुटी
दुबार नावे: आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, त्यांनी या यादीतील 3 ते 4 हजार त्रुटी आणि आक्षेप घेतले आहेत. निवडणूक आयोगाने दाखवलेले 14 लाख दुबार मतदार काढले जातील. पण आमच्या पक्षाचे आमदार सुनील गोविंद शिंदे यांचे वय आणि फोटो वेगळे असूनही त्यांचे नाव 7 वेळा आले आहे.
मराठी मतदारांना लक्ष्य: त्यांनी आरोप केला की, दुबार मतदारांमध्ये मराठी मतदारांची नावे अधिक आहेत. माजी नगरसेविका श्रद्धा जाधव यांचे नाव 8 वेळा आले आहे, तर ज्योती गायकवाड आणि अनिल देसाई यांचे नावही दुबार मतदारांमध्ये आहे.
बीएलओ (BLO) वर आक्षेप : बीएलओ म्हणून ज्यांना लिहिता वाचता येत नाही, अशी लोक मतदार तपासणी करत आहेत. यादी वाचता येत नाही, असे लोक तपासणीसाठी येत असल्याचे त्यांनी म्हटले.
मृत मतदारांची नावे: मृत मतदारांचे डेथ सर्टिफिकेट देऊन सुद्धा मतदार यादीत त्यांची नावे कायम आहेत. “यांच्या नावावर कोणी प्रॉक्सी वोटिंग करतंय का? या सगळ्याचे उत्तरं देणार कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आदित्य ठाकरेंचा थेट प्रश्न
या गोंधळावरून आदित्य ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर आणि आयोगावर निशाणा साधला. ते म्हणाले, “आम्ही बीएमसी, राज्य आणि केंद्र निवडणूक आयोगाला विचारात आहोत, तुम्ही काय करत आहात? थट्टा करत आहात, तुम्ही सर्कस करत आहात? हा घोळ तुम्हीच घातलेला आहे.”
त्यांनी यादीवर काम करण्यासाठी पक्षाने आणखी काही दिवसांची मुदत मागून घेतली असल्याचे सांगितले. तसेच, नियमानुसार 1 जुलै 2025 नंतर एकही मतदार यादीमध्ये येऊ शकत नाही, पण आताच्या यादीमध्ये 33 हजार मतदार हे नव्याने आले आहेत, असाही आरोप त्यांनी केला.



