महाराष्ट्र
Trending

Mirza Rafi Ahmed Baig Passes Away: सुप्रसिद्ध हास्यसम्राट कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन; साहित्यविश्वात हळहळ

Mirza Rafi Ahmed Baig Passes Away: 68 व्या वर्षी अमरावती येथे घेतला अखेरचा श्वास; विनोदी आणि वऱ्हाडी काव्यशैलीमुळे 6 हजारांहून अधिक सादरीकरणे गाजवली

अमरावती :- महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात विनोदी काव्यसादरीकरणाची एक वेगळी आणि खास ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट आणि ‘मिर्झा एक्सप्रेस’ फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज (शुक्रवार, 28 नोव्हेंबर) सकाळी 6.30 वाजता अमरावती येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. Mirza Rafi Ahmed Baig Passes Away त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या काव्य आणि साहित्यविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

डॉ. मिर्झा रफी अहमद बेग हे गेल्या काही महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर अमरावतीत उपचार सुरू होते. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज – माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव होते. सध्या ते अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ‘मिर्झा एक्सप्रेस’ नावाच्या घरात वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज, आणि दोन कन्या महाजबी व हुमा असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी दोननंतर अमरावती येथील ईदगाह कब्रस्तानात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

‘मिर्झा एक्सप्रेस’ची लोकप्रियता
डॉ. मिर्झा रफी अहमद बेग हे विदर्भ-मराठवाडा परिसरात कविसंमेलनांचे एक मोठे आकर्षणबिंदू होते. त्यांच्या नावाने प्रसिध्द असलेली ‘मिर्झा एक्सप्रेस’ काव्यमैफल महाराष्ट्रभरात अतिशय लोकप्रिय होती. त्यांनी आपल्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत 6 हजारांहून अधिक काव्य सादरीकरणे केली. त्यांच्या नावावर तब्बल 20 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ते विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील राहिले होते.

त्यांच्या सादरीकरणाची खुमासदार भाषा, तुफानी विनोद, ग्रामीण बोलीतील पोट धरून हसवणारे किस्से, आणि सामाजिक प्रश्नांवर मार्मिक भाष्य करणारी शैली त्यांची खास ओळख होती. शेती, माती, ग्रामीण भाग, शेतकऱ्यांचे प्रश्न, राजकीय विसंगती आणि सामाजिक समस्यांवरील हलक्या-फुलक्या, पण अचूक अशा नर्म विनोदी शैलीतील लेखन त्यांच्या लोकप्रियतेचे गमक ठरले. मराठी आणि वऱ्हाडी भाषेवर त्यांचे प्रचंड प्रेम होते आणि त्यांच्या कार्यक्रमांमुळे वऱ्हाडी भाषेची महती देशभर झाली. ‘मोठा माणूस’, ‘सातवा महिना’, ‘उठ आता गणपत’, ‘जांगडबुत्ता’ अशा कितीतरी कविता त्यांच्या लोकप्रिय झाल्या. ‘जांगडबुत्ता’ या शब्दाचे ते जनक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0