
Rani Bhag Latest News : आयुक्तांच्या परवानगीची वाट? चौकशी समिती नेमा, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा; व्याघ्रप्रेमींची आक्रमक मागणी
मुंबई :- मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील (राणी बाग) ‘शक्ती’ नावाच्या वाघाचा 17 नोव्हेंबर 2025 रोजी झालेला मृत्यू प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे अधिक संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वाघाचा मृत्यू होऊनही तब्बल आठ दिवस ही माहिती दडवून ठेवल्याने, ‘राणीबागेत नेमकं काय शिजलं?’ असा संतप्त सवाल वन्यजीवप्रेमी विचारत आहेत.
प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न
राणीबाग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:15 वाजता ‘शक्ती’चा मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार अपस्माराच्या झटक्यामुळे वाघ मृत्युमुखी पडला असावा. मात्र, ही माहिती 24 नोव्हेंबरपर्यंत सार्वजनिक न केल्याने प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरली आहे. माहिती दडवण्यामागे मुंबई महापालिका आयुक्तांच्या परवानगीची वाट पाहण्यात आली, अशी शक्यता आमदार अजय चौधरी यांनी व्यक्त केली आहे.
मृत्यूचे नेमके कारण काय? हाड की न्यूमोनिया?
वाघाच्या मृत्यूच्या कारणाबाबत परस्परविरोधी दावे समोर येत आहेत. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राथमिक अहवालात मृत्यूचे कारण ‘पायोग्रॅन्युलोमॅटस न्यूमोनियामुळे श्वसन निकामी होणे’ (Payogranulomatous Pneumonia Resulting in Respiratory Failure) असे दिले आहे. ‘शक्ती’ची फुफ्फुसे 90 टक्के निकामी झाली होती, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
मात्र, व्याघ्रप्रेमी प्रथमेश जगताप आणि आमदार अजय चौधरी यांनी यावर गंभीर शंका उपस्थित केली आहे. मांस खाताना श्वसन नलिकेजवळ हाड अडकल्यामुळे ‘शक्ती’चा मृत्यू झाला असावा आणि उपचाराअभावी वाघाने जीव गमावला, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
विलंब आणि शवविच्छेदनावर संशय
मृत्यूची माहिती केंद्र आणि राज्य प्राधिकरणांना 18 नोव्हेंबरला ईमेलने कळवली गेली असली तरी, जनतेला आणि प्राणीप्रेमींना ती आठ दिवस का कळवली नाही? तसेच, शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल येण्यापूर्वीच आणि ही माहिती जाहीर न करताच वाघाच्या मृतदेहाची घाईघाईत विल्हेवाट का लावली गेली? ‘इन कॅमेरा’ (In Camera) शवविच्छेदन झाले का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा!
‘शक्ती’च्या मृत्यूला प्राणी संग्रहालय प्रशासन आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप करत, प्रथमेश जगताप यांनी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. आमदार अजय चौधरी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांनी विशेष चौकशी समिती नेमावी, अशी मागणी केली आहे.
फेब्रुवारी 2020 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथून ‘शक्ती’ (तत्कालीन वय साडेतीन वर्षे) राणीबागेत आला होता आणि वाघीण ‘करिश्मा’ व वाघ ‘जय’ यांच्यासोबत तो राहत होता. काही महिन्यांपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचा दावा प्रशासनाने केला असतानाच हा मृत्यू झाल्याने, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य कधी बाहेर येणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


