Kalyan Crime News : कल्याण शीळ रोडवर सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला!

Kalyan Latest Crime News : देसाई खाडी परिसरात खळबळ; हत्या करून मृतदेह फेकल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज, ओळख पटवण्याचे मोठे आव्हान!
ठाणे :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात खुनाच्या वाढत्या घटनांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण केला असतानाच, ठाणे जिल्ह्यातील कल्याण शीळ रोडवर एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. देसाई खाडी परिसरात एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. Kalyan Latest Crime News
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतदेह आढळलेल्या तरुणीचे वय अंदाजे 28 ते 30 वर्षे आहे. तिची निर्घृणपणे हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरून देसाई खाडीच्या परिसरात फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
राज्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचा आणि पोलीस नेमकं काय करत आहेत, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात असतानाच ही घटना समोर आली आहे. या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच डाकघर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून, फॉरेन्सिक टिमकडून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम करण्यात आले आहे. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकते.
ओळख आणि आरोपीचा शोध
सध्या पोलिसांपुढे सर्वात मोठे आव्हान मृत तरुणीची ओळख पटवण्याचे आहे. तरुणीची ओळख पटल्याशिवाय आरोपीचा शोध घेणे पोलिसांसाठी अत्यंत किचकट कोडे बनले आहे. पोलीस सध्या खाडी परिसराची कसून तपासणी करत असून, लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर तांत्रिक बाबींच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.



