मुंबईठाणे
Trending

Mumbai Boy Suicide News :’मराठी तरुणाच्या’ आत्महत्येवरून राजकारण तापले! ‘संपलेले राजकारण जिवंत करू नका’ – भाजपचा ठाकरे गटाला कडक इशारा!

Amit Satam At Shivaji Park : दादर शिवाजी पार्कवर ‘सद्बुद्धी आंदोलन’; अमित साटम यांच्यासह कार्यकर्त्यांनी तोंडाला बांधली काळी पट्टी!

मुंबई :- लोकल ट्रेनमध्ये हिंदी भाषेत बोलल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामुळे नैराश्यात गेलेल्या 19 वर्षीय अर्णव खैरे या मराठी तरुणाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मराठी प्रवाशांनीच मराठी तरुणाला हिंदी बोलल्यामुळे मारहाण केली आणि अपमानित केले, ज्यामुळे खैरे याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

दादर शिवाजी पार्कवर ‘सद्बुद्धी’साठी निदर्शने

मराठी-अमराठी वादातून तरुणाने आत्महत्या केल्याने या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी भाजपा मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात आज शनिवारी (22 नोव्हेंबर) दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ‘सद्बुद्धी आंदोलन’ करण्यात आले. यावेळी साटम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला. त्यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन हे आंदोलन केले.

‘संपलेले राजकारण जिवंत करण्याचा केविलवाणा प्रयत्न’

आंदोलनावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अमित साटम यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, “अर्णव खैरे नावाच्या मराठी मुलाला रेल्वेमध्ये मारहाण झाली आणि त्या वेदनांमुळे त्याने घरी जाऊन आत्महत्या केली. काही व्यक्ती आणि राजकीय पक्ष केवळ भाषा, प्रांत याच्या आधारावर समाजात तेढ निर्माण करण्याचे राजकारण करत आहेत.”

साटम यांनी थेट आरोप केला की, “स्वतःचे संपलेले राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरिता प्रक्षोभक अशा प्रकारची विधाने करण्यात येत आहेत. लोकांची माथी भडकावण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न आहे.” याच राजकारणाचा परिणाम म्हणून मराठी तरुणाला जीव गमवावा लागला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मराठी गीताचा दिला संदर्भ:’माणसाने माणसासम वागणे’

यावेळी अमित साटम यांनी विरोधकांना मराठीतील एका गीताचा संदर्भ दिला. ते म्हणाले, “माणसाने माणसाशी माणसासम वागणे.. हेच आमचे मागणे, हीच आमुची प्रार्थना.. हे मराठीतील गीत मराठीचा कैवार घेणाऱ्या काही लोकांनी ऐकावे आणि त्याचा अभ्यास करावा.” त्यांनी विरोधकांना विकास आणि कामाच्या आधारावर मत मागण्याचे आव्हान करत, “मुंबई शहराच्या सोशल फॅब्रिकला धक्का पोहोचवण्याचे काम कोणी करू नये,” असा आक्रमक इशारा दिला.

पोलीस तपास सुरू, पण…
साटम यांनी स्पष्ट केले की, या आत्महत्या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे आणि दोषींना शिक्षा होईलच. परंतु, या घटनेमुळे अर्णव खैरे हा तरुण आपल्या आई-वडिलांना परत मिळणार नाही, ही वेदनादायी गोष्ट आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी जनजागृती करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0