
Chakan Politics News : ‘राजकारण बाजूला ठेवून आदरांजली’: ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळेंचा स्पष्ट खुलासा; युती नगराध्यक्ष पदापुरतीच मर्यादित
चाकण (पुणे) :- शिवसेना पक्षात मोठी फूट पडून उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यात टोकाचे वितुष्ट निर्माण झाले असताना, महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनपेक्षित आणि महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. राज्यात कुठेही एकत्र न आलेली ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना चाकण नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आली आहे.
शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरण्यासाठी खुद्द ठाकरे गटाचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
या युतीबाबत बोलताना आमदार बाबाजी काळे यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पश्चात ही पहिली निवडणूक आहे. त्यांच्या पत्नी मनीषा गोरे नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत. अशा प्रसंगी आम्ही राजकारण बाजूला ठेवून, दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून केवळ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिला आहे.”
काळे यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय केवळ चाकण नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित असेल आणि याला युती म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदी नगरपरिषद निवडणुकीत ठाकरे गट स्वबळावर लढत असल्याचे त्यांनी सांगितले.
हा भावनिक आणि राजकीय निर्णय चाकणपुरता मर्यादित असला तरी, महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे’ आणि ‘शिंदे’ गट एकत्र आल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे.


