मुंबईठाणे
Trending

Dhananjay Munde : मनोज जरांगेंच्या ‘हत्येच्या कटा’च्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा संतापून पलटवार!

Dhananjay Munde On Manoj Jaranage Patil : “माझं आणि जरांगेंचं वैर काय, कर्मा रिपीट्स; हे महागात पडेल!” मुंडेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी

बीड :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन, आपली हत्या घडवून आणण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी अडीच कोटींची सुपारी दिल्याचा जो खळबळजनक आरोप केला होता, त्यावर मुंडेंनी तातडीने माध्यमांशी संवाद साधत सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी जरांगे यांचे सर्व आरोप फेटाळून लावत, या सर्व गोष्टी जरांगे यांना भविष्यात महागात पडतील, असा इशाराही दिला आहे.

धनंजय मुंडे यांनी आपल्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण देताना म्हटले की, “माझं आणि जरांगे यांचं काही वैर नाही. मी मुंबईतील मराठा आंदोलनात सामील झालो होतो. माझ्याकडून त्यांना कसला धोका आहे? माझा काय त्यांच्या बांधाला बांध आहे का,” असे विचारत त्यांनी संताप व्यक्त केला. अटक झालेले कार्यकर्ते त्यांचे आहेत, बोलणारे कार्यकर्ते त्यांचे आहेत आणि कबुली जबाब देणारेही त्यांचेच आहेत. तरीही आरोप मात्र माझ्यावर करत आहेत, ज्यामुळे माझ्या जीवनात ‘मर्डरर’ म्हणून माझी प्रतिमा तयार केली जात आहे, असे म्हणत मुंडेंनी आपल्याला टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला. ते पुढे म्हणाले की, “मी दर सोमवारी गेस्ट हाऊसला बसतो. अनेक लोक येऊन भेटतात. अटक केलेल्यांपैकी कुणी भेटलं असेल, बाजूला जाऊन बोललं असेल. मी सामान्य सरळ माणूस आहे. भेटल्याने आणि बाजूला बोलल्याने लगेच कट रचला जातो, असे होत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुंडेंनी जरांगे पाटील यांना केवळ एकाच प्रश्नाचे उत्तर देण्याचे थेट आव्हान दिले. “जरांगेनी फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं. कधी आहे तुमची तयारी? ईडब्ल्यूएसमध्ये जास्त आरक्षण मिळतं की ओबीसीत मिळतं? तारीख तुम्ही सांगा, जागा तुम्ही सांगा. महाराष्ट्र बघेल. दाखवून देऊ ईडब्ल्यूएसमध्ये जास्त मिळतं की ओबीसीत मिळतं,” असे ते म्हणाले.

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी करत मुंडेंनी थेट आपली नार्को टेस्ट (Narco Test) आणि ब्रेन मॅपिंग (Brain Mapping) करण्याची मागणी केली आहे. “या सर्व प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सरकारने नाही तर सीबीआयने केली पाहिजे. माझ्या मनात कुणाला मारायचं पाप आलं असेल, तर माझी ब्रेन मॅपिंग करा. जरांगेंचीही करा, आरोपींची करा. अडचण येत असेल तर मी कोर्टाची परवानगी घेऊन माझी आणि जरांगेंची ब्रेन मॅपिंक आणि नार्को टेस्ट करण्याची परवानगी घेतो,” अशा शब्दांत त्यांनी जरांगे यांचे सर्व आरोप परतवून लावले.

शेवटी, मुंडे यांनी जरांगे पाटील यांना इशारा देत म्हटले की, “या सर्व गोष्टी जरांगे जी महागात पडणार आहेत. कर्मा रिपीट्स (Karma Repeats). तुम्ही जेवढं खोटं कराल, तेवढं ते मागे फिरेल.”

या अत्यंत गंभीर आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून, आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0