मुंबईठाणे
Trending

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; “अडीच कोटींची सुपारी देऊन हत्येचा कट!”

Manoj Jarange Patil On Dhananjay Munde : जरांगे पाटील यांची मुंडेंच्या चौकशीची मागणी; पंकजा मुंडे, सुरेश धस यांच्यासह अनेक नेत्यांना धोका असल्याचा दावा

जालना :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची तक्रार काल (गुरुवारी) जालना पोलिसांकडे Jalna Police दाखल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आज (शुक्रवारी) सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी थेट राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेDhananjay Munde यांच्यावर हा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. जरांगे पाटील यांनी मुंडे हे आपली हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आणि त्यासाठी अडीच कोटींची सुपारी दिल्याचा दावा केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी मोठा कट रचला असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या हत्येच्या कटात ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींनी धनंजय मुंडे यांच्या भेटी घेतल्या आहेत. हा कट उधळण्याअगोदरच 12 वाजता आरोपी आणि मुंडे यांचे बोलणे झाल्याचा आरोप त्यांनी केला. बीडमध्ये आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली आणि हत्येचा कट रचला गेला. जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे हे या सामूहिक घातपाताच्या कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

छत्रपती संभाजीनगरजवळ एका ठिकाणी मुंडे या आरोपींची वाट पाहत उभे होते, जिथे त्यांनी भेट घेऊन गोळ्या देण्यास सांगितल्याचा दावा जरांगे यांनी केला. तसेच, जरांगे यांच्या वाहनाला दुसऱ्या वाहनाने धडक देण्याची योजना असल्याचा दावाही त्यांनी केला. मुंडेंचे हे ‘नपुंसक चाळे’ आहेत, त्यांनी थेट येऊन भिडायला हवे होते, असे आव्हान जरांगे यांनी दिले.

यावेळी जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळीपासून राज्यातील अनेक नेत्यांना धोका असल्याचेही संकेत दिले. त्यांनी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, बीड जिल्ह्यातील काही नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाचा यांच्याविषयीचे कॉल रेकॉर्ड आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. वंजारी समाजातील काही अधिकारी आणि ओएसडी (OSD) यांना हाताशी धरून धनंजय मुंडे काही नेत्यांविरोधात कट रचत असल्याचे सूतोवाच जरांगे पाटील यांनी केले. बीडमध्ये वाहनातील आसनाखाली फोन लपवून ठेवण्यात येतो आणि त्यातून अनेक नेत्यांविरोधातील षडयंत्र बाहेर आल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. अशा माध्यमातून काही नेत्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे संकेत त्यांनी दिले.

या अत्यंत गंभीर आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0