मुंबईठाणे

Sanjay Raut : रुग्णालयातून संजय राऊतांचा ‘तो’ फोटो व्हायरल; सलाईन लावूनही लिहिताहेत ‘अग्रलेख’?

Sanjay Raut Health Update : ‘हात लिहिता राहिला पाहिजे’ म्हणत राऊतांनी शेअर केली भावनिक पोस्ट; प्रकृती बिघडल्याने फोर्टिसमध्ये उपचार सुरू

मुंबई :- शिवसेना (ठाकरे गट) चे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत Sanjay Raut यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील भांडूपमधील फोर्टिस रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रम आणि माध्यमांपासून दूर असलेल्या राऊत यांनी आता थेट रुग्णालयातूनच आपला एक फोटो शेअर केला आहे, जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

रुग्णालयाच्या बेडवरून थेट ‘सामना’साठी लेखन?

संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (माजी ट्विटर) अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते रुग्णालयातील बेडवर रुग्णाचे कपडे घालून बसलेले दिसत आहेत. त्यांच्या हाताला सलाईन लावलेली असतानाही, ते हातात पेन आणि पेपर घेऊन काहीतरी लिहीत आहेत. विशेष म्हणजे, या पेपरवर ‘एडिट’ (Edit) असे लिहिलेले दिसत असल्याने, ते शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’चा अग्रलेख लिहीत असावेत, असा अंदाज त्यांचे कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

कॅप्शनने वेधले लक्ष

राऊत यांनी हा फोटो शेअर करताना एक हटके आणि भावनिक कॅप्शनही दिले आहे:

“हात लिहिता राहिला पाहिजे. कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे वृत्तपत्र हा आमच्या पिढीचा मंत्र होता!”

प्रकृती बिघडल्याने उपचार सुरू

गेल्या काही दिवसांपासून खासदार राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे ते सार्वजनिक कार्यक्रम आणि माध्यमांपासून दूर आहेत. वैद्यकीय तपासण्या आणि उपचार पूर्ण झाल्यावर ते विश्रांतीसाठी आपल्या मैत्री निवासस्थानी परतणार असल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी राऊत यांनी एक पत्रकही शेअर केले होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की, “सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरु आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन.”

रुग्णालयात असतानाही आपले काम सुरू ठेवण्याच्या संजय राऊत यांच्या भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0