क्राईम न्यूज
Trending

Ganesh Naik : ठाण्यात शिंदे यांना गणेश नाईकांचे आव्हान? भाजपने नाईकांवर सोपवली जिल्ह्याची निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी

Thane Ganesh Naik Latest News : नवी मुंबईचे निवडणूक प्रमुखपद पुत्र संजीव नाईक यांच्याकडे; आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आक्रमक

ठाणे :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज, बुधवारी सायंकाळी उशिरा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी नेत्यांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपने शिंदे यांचे कडवे विरोधक मानले जाणारे वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर निवडणूक प्रभारी पदाची मोठी जबाबदारी सोपविली आहे.

शिंदे विरोधात नाईक आक्रमक

नवी मुंबईतील नाईकांच्या बालेकिल्ल्यात त्यांचे माजी खासदार पुत्र संजीव नाईक यांच्याकडे निवडणूक प्रमुखपद सोपविण्यात आले आहे. या नियुक्त्यांमुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाणे जिल्ह्यात भाजपने शिंदे यांच्या विरोधात आक्रमक पाऊल उचलल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या निवडणुका तोंडावर असताना, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नियुक्तीची घोषणा केली.

गणेश नाईकांकडे ठाणे जिल्ह्याची जबाबदारी

गणेश नाईक यांच्याकडे ठाणे जिल्ह्यातील सात विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, भिवंडी, मिरा भाईंदर, नवी मुंबई, कल्याण आणि उल्हासनगर या विभागांचा समावेश आहे.

विभागनिहाय निवडणूक प्रमुख

नाईक यांच्या नेतृत्वाखालील प्रत्येक विभागासाठी निवडणूक प्रमुखांचीही नियुक्ती करण्यात आली आहे:

ठाणे शहर: आमदार संजय केळकर

ठाणे ग्रामीण: माजी खासदार कपिल पाटील

भिवंडी: आमदार महेश चौघुले

मिरा भाईंदर: आमदार नरेंद्र मेहता

नवी मुंबई: माजी खासदार संजीव नाईक

कल्याण: नाना सुर्यंवशी

उल्हासनगर: प्रदीप रामचंदानी

वसई-विरार आणि पालघर: आमदार राजन नाईक आणि बाबाजी काठोळे

रायगड उत्तर व दक्षिण: रामशेठ ठाकूर आणि सतीश धारप

राजकीय चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढावी, या मताचे नाईक आहेत. त्यांनी मध्यंतरी ‘पक्षाने संधी दिल्यास ठाण्यात कमळ उगवून दाखवेल’ असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर नाईक यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारीपद सोपवून भाजपने शिंदे यांनाच एकप्रकारे आव्हान उभे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तसेच, नवी मुंबईतही नाईक विरुद्ध आमदार मंदा म्हात्रे असा सामना दिसत असताना, संजीव नाईक यांच्याकडे निवडणूक प्रमुखपद सोपवून भाजपने शिंदे सेनेशी दोन हात करण्याची तयारी दाखवली आहे.

दरम्यान, भाजपच्या यादीतील बहुतांश जबाबदाऱ्या खासदार, आमदार आणि मंत्र्यांवर निश्चित करण्यात आल्या आहेत, त्यामुळे ठाण्याची जबाबदारी गणेश नाईक यांना दिली म्हणजे एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले असे थेट म्हणता येणार नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे सेनेतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0