
Sunil Shukla Banner : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत भाषेच्या वादाचा भडका; ‘उत्तर भारतीय सेना’ प्रमुख सुनील शुक्ला चर्चेत
मुंबई :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण तापले असतानाच, मुंबईत पुन्हा एकदा भाषेच्या मुद्द्यावरून मोठा वाद उफाळून आला आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’ बाहेर लावण्यात आलेल्या अत्यंत वादग्रस्त पोस्टरमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बॅनरवरील धमकीवजा इशारा
उत्तर भारतीय सेना या संघटनेच्या वतीने लावण्यात आलेल्या या बॅनरमध्ये “उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे” असा थेट धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. या बॅनरवरील मजकूर आणि भाषेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
बॅनर मुंबईतील शिवसेना भवन, शिवाजी पार्क, आणि मातोश्री यांसारख्या ठाकरे गटाच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये लावण्यात आले आहेत.
या बॅनरवर उत्तर भारतीयांना ‘सावधान’ असा मोठा इशारा देण्यात आला आहे.
“महाराष्ट्र से बिहार तक, राजस्थान से यूपी तक” असाही यात उल्लेख आहे.
बॅनरच्या खाली ‘उत्तर भारतीय सेना’ असे लिहिले असून, संघटनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांचा फोटोही छापण्यात आला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर राजकारण पेटणार?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यामुळे मुंबई-ठाण्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या उत्तर भारतीय मतदारांवर पकड मजबूत करण्याची धडपड सुरू आहे. उत्तर भारतीय मतदारांना एकत्र ठेवण्याच्या उद्देशाने हे पोस्टर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आले असले तरी, त्यातील आक्रमक भाषा शहरात तणाव निर्माण करण्याची शक्यता वाढवते.
सुनील शुक्ला यांची आक्रमक भूमिका
‘उत्तर भारतीय सेना’चे अध्यक्ष सुनील शुक्ला गेल्या काही महिन्यांपासून उत्तर भारतीय समाजाच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यांवर त्यांनी अनेकदा आक्षेप घेतला आहे. मात्र, आता थेट मातोश्रीसमोरच हे वादग्रस्त बॅनर लागल्याने मुंबई पोलिसांपुढे कायदा आणि सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शहरात प्रादेशिक भावना भडकवणाऱ्या अशा पोस्टरवर पोलीस कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


