Dombivli Robbery News : डोंबिवलीत ‘चोरट्यांची टोळी’ सक्रिय; छेडा रस्त्यावर एकाच रात्री 4 व्यापारी गाळे फोडले

Dombivli Latest Crime News :,सीसीटीव्हीत टोपीवाला चोरटा कैद; ज्येष्ठ पुरोहितांच्या कार्यालयासह किराणा दुकानातही चोरी
डोंबिवली :- डोंबिवली पूर्व भागातील मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या छेडा रस्त्यावर चोरट्यांनी आता आपले लक्ष्य केंद्रित केले आहे. शनिवार मध्यरात्रीच्या सुमारास सर्वाधिक वर्दळीच्या छेडा रस्त्यावर चोरट्यांनी एकाच वेळी ज्येष्ठ पुरोहित लक्ष्मण पारेकर गुरूजी यांचे अध्यात्मिक कार्यालय आणि लगतचे एकूण तीन व्यापारी गाळे तोडून मोठी चोरी केली आहे.
छेडा रस्त्यावरील कुवर बाग सोसायटी आणि न्यू जयश्री सोसायटीच्या तळमजल्यावर असलेल्या व्यापारी गाळ्यांमध्ये ही घरफोडी झाली. चोरट्यांनी लोखंडी कटावणी किंवा धारदार अवजारांचा वापर करून या गाळ्यांची कुलपे आणि लोखंडी प्रवेशद्वारे तोडली. रात्री दहा ते सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान (मध्यरात्रीच्या सुमारास) चोरट्यांनी ही कृत्ये केली. चोरट्यांनी लक्ष्मण पारेकर गुरूजींचे अध्यात्मिक कार्यालय, देवपूजेच्या साहित्याचे सुगंधी भांडार, संतोष साळी यांचे संगणक प्रशिक्षण केंद्र आणि पेंडसेनगर भागातील दिनेश चौधरी यांचे किराणा दुकान लक्ष्य केले.
चोरी झालेल्या एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक चोरटा कैद झाला आहे. टोपी घालून आपली ओळख लपवलेला हा चोरटा दुकानात पैसे आणि किमती ऐवज मिळतो का याची तपासणी करत असल्याचे दिसत आहे. या चोरट्याचे अन्य साथीदार बाहेर पाळत ठेवण्यासाठी उभे असावेत, असा पोलिसांना संशय आहे.
या चोरीप्रकरणी पूजा साहित्य सुगंधी भांडारचे मालक प्रशांत सखाराम खाडे (वय 50) यांनी इतर तीन घरफोड्या झालेल्या नागरिकांच्या वतीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या चारही ठिकाणची पाहणी करून चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला असून रामनगर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.


