Rohit Pawar : ‘आई मेली तरी चालेल, पण मावशी मरायला नको’: प्रकाश सुर्वे यांच्या वादग्रस्त विधानावर रोहित पवारांचा संताप

•”मतांसाठी किती लाचारी?” पवारांचा थेट सवाल; सुर्वे यांनी अखेर मागितली माफी
मुंबई :- शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांनी एका कार्यक्रमात ‘मराठी ही आई आणि उत्तर भारत मावशी’ असल्याचे सांगत, “आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरायला नाही पाहिजे” असे केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हा भाषिक मुद्दा पेटला आहे.
रोहित पवारांची थेट टीका
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुर्वे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत निशाणा साधला. त्यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले:
“मतांसाठी किती लाचारी करावी माणसाने…! महाशक्तीने कुबड्या काढून घेण्याच्या हालचाली सुरु होताच हे महाशय महापालिका निवडणुकीत मतांसाठी मराठीचाही गळा घोटायला निघालेत. ज्यांना मराठीरुपी आईची किंमत नाही त्यांना उद्या मुंबईची काय किंमत राहील?”
प्रकाश सुर्वे यांचे मूळ वक्तव्य
प्रकाश सुर्वे यांनी आपल्या भाषणात उत्तर भारतीयांना उद्देशून म्हटले होते की, “मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल. पण मावशी मरायला नको. कारण मावशीचं आपल्यावर जास्त प्रेम असतं. मला माझ्या आईपेक्षा जास्त प्रेम तुम्ही (उत्तर भारतीयांनी) दिलं आहे. माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी तुमचं प्रेम असंच ठेवा.”
ठाकरे गटाकडूनही टीका
शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनीही सुर्वे यांच्यावर हल्ला चढवला. दानवे म्हणाले की, “प्रकाश सुर्वे यांना आईचं महत्त्व माहिती नसेल. मागे एका ब्रिजवर त्यांनी केलेला प्रकार सर्वांनी पाहिला होता. त्यांचं ते कर्तृत्व सगळ्यांनीच पाहिलं. ही माणसं आपल्या आईचा सन्मान काय राखणार? असे पुत्र असतील तर त्यांचं व त्यांच्या पक्षाचं चांगलं कल्याण होईल.”
सुर्वे यांनी अखेर मागितली माफी
राज्यभरातून टीकेची झोड उठल्यानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांनी अखेर माफी मागितली आहे. त्यांनी सारवासारव करत म्हटले की, “मराठी आमची मायमाऊली आहे. काल अनावधानाने माझ्या तोंडून ते शब्द गेले,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.


