
Ashish Shelar On Raj Thackeray : ‘सक्षम ॲप’ आणि ‘मतचोरी’वरून टीका; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाजपचा आक्रमक प्रत्युत्तर
मुंबई :- राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या BMC Election पार्श्वभूमीवर मतदारांच्या याद्यांवरून राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी थेट सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी ‘सक्षम ॲप’ (Saksham App) आणि निवडणूक आयोगाच्या सर्व्हरबद्दल बोलताना गंभीर संशय व्यक्त केला. ते म्हणाले, “सक्षम ॲप आणि निवडणूक आयोग सर्व्हर हे आयोग हाताळत नाही, असा संशय आम्हाला आहे. ही सगळी निवडणूक आयोगाची भूताटकी आहे.” मतदारांना त्यांच्या नावात गोंधळ नाही ना? हे तपासण्यासाठी त्यांनी थेट शिवसेना (UBT) शाखेमध्ये येण्याचे आवाहन केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून टीका
उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि नुकसानीच्या मुद्द्यावरही सरकारला घेरले. “मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली होती. महात्मा फुले कर्जमाफीचा दुसरा टप्पा जाहीर करावा, कारण डेटा तसाच आहे,” असे ते म्हणाले. केंद्राचे पथक तीन दिवसांत पाहणी करणार; “आता पाहणी करणार कधी आणि प्रस्ताव देणार कधी?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, “शेतकऱ्यांचे पुढच्या वर्षी जूनमध्ये कर्जमाफी होणार तर आताचे हप्ते भरायचे कीं नाही भरायचे?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आशिष शेलारांवर पलटवार
मतचोरीच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी आशिष शेलार यांचं जाहीर अभिनंदन करतो. त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलं आहे.” तसेच, “देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये प्रचार करुन आल्यानंतरच आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेतली. आशिष शेलारांनी सिद्ध केलंय की, मतदार यादीत गोंधळ आहे,” असेही ठाकरे म्हणाले.
शेलारांचा ‘व्होट जिहाद’चा आरोप
दरम्यान, ठाकरे बंधूंनी एकत्र येत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला. शेलार म्हणाले, “गळा मतचोरीचा… पण पुळका ‘व्होट जिहाद’चा!” लोकसभा निवडणुकीत दुबार मतदारांची नोंद झाल्याचा आरोप करत, महाविकास आघाडीने प्रामाणिक मतदारांची नावे वगळून ‘व्होट जिहाद’चा डाव रचला, तसेच राज ठाकरे व्होट जिहाद करत असल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला.


