
Aaditya Thackeray On Sanjay Raut : ‘प्रत्येक संकटातून जिंकतोस’, आदित्य ठाकरेंच्या पोस्टला राऊतांचे ‘माय डियर आदित्य’ म्हणत प्रत्युत्तर
मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनी तब्बल दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या Mumbai BMC Election तोंडावर राऊतांनी घेतलेल्या या ब्रेकमुळे ठाकरे गट चिंतेत असताना, युवा नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांना भावनिक संदेश दिला आहे.
आदित्य ठाकरेंचा संदेश
संजय राऊत यांना त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन करताना आदित्य ठाकरे यांनी ‘संजय काका’ या शब्दांत प्रेम व्यक्त केले. आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले:
“काळजी घे संजय काका. प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस. आत्ताही तेच होईल, खात्री आहे.”
आदित्य यांच्या या भावनिक पोस्टला संजय राऊत यांनीही त्वरित प्रत्युत्तर दिले. “धन्यवाद, माय डियर आदित्य,” असे त्यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदींनीही केली होती चौकशी
उल्लेखनीय आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल (गुरुवारी) एका पोस्टद्वारे संजय राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्याची कामना केली होती. मोदी म्हणाले होते: “संजय राऊत जी, लवकरात लवकर बरे व्हा. मी तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो.”
यावर राऊत यांनीही त्यांचे आभार मानले होते: “आदरणीय पंतप्रधान धन्यवाद. माझे कुटुंब आपले आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.” राजकीय मतभेद असूनही नेतेमंडळींनी घेतलेल्या या माणुसकीच्या भूमिकेचे राजकीय वर्तुळात कौतुक होत आहे.


