
Sanjay Raut Latest News : मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची (ठाकरे गट) धडाडती तोफ विश्रांतीवर; नवीन वर्षात पुनरागमन
मुंबई :- राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची धडाडती तोफ असलेले खासदार संजय राऊत Sanjay Raut यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. या आजारामुळे संजय राऊत यांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता थेट नवीन वर्षात सार्वजनिक जीवनात पुनरागमन करतील. मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना, राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेणे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रेक
संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच आपल्या ट्विटर हँडलवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्रक प्रसिद्ध केले, ज्यात त्यांनी प्रकृतीची गंभीर समस्या उद्भवल्याचे नमूद केले आहे.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
वैद्यकीय तपासणी झाली असली तरी, प्रकृतीत इतका गंभीर बिघाड होईल, अशी कोणालाही कल्पना नव्हती.
दररोज सकाळी नियमाने पत्रकार परिषद घेणारे संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदही घेतली नव्हती. त्यानंतर लगेचच त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दलची माहिती समोर आली.
संजय राऊतांच्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?
सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यासाठी नम्र विनंती…..!!
जय महाराष्ट्र !…..आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन.
वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे.
मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीवाद असेच राहू द्या.कळावे.
ठाकरे गटासाठी खिंड लढवणारे नेते
2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्यापासून, संजय राऊत हे सातत्याने प्रभावीपणे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत.
ठाकरे गटाचा अजेंडा प्रभावीपणे मांडण्यात आणि विरोधकांवर आक्रमकपणे टीका करण्यात संजय राऊत यांनी एकहाती खिंड लढवली आहे. राऊतांच्या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी महायुतीने अनेक नेत्यांची फौज तैनात केली असली तरी, संजय राऊत नेहमीच या सर्वांना पुरुन उरत असल्याचे दिसून आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर राऊत यांच्यासारख्या महत्त्वाच्या नेत्याने ब्रेक घेणे, ठाकरे गटासाठी चिंता वाढवणारे आहे.


